जोकोविचची फेडररच्या विक्रमाशी बरोबरी
वृत्तसंस्था/ टय़ुरिन (इटली)
2022 च्या टेनिस हंगामाअखेरीस येथे रविवारी झालेल्या एटीपी फायनल्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या माजी टॉप सीडेड नोव्हॅक जोकोविचने विक्रमी सहाव्यांदा एकेरीचे अजिंक्मयपद पटकावून स्वीसचा माजी टेनिसपटू रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधली. पुरुष दुहेरीत अमेरिकेचा राजीव राम आणि ब्रिटनचा जो सॅलीसबेरी यांनी विजेतेपद पटकाविले.
रविवारी येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोविचने नॉर्वेच्या कास्पर रुडचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 93 मिनिटे चालला होता. जोकोविचने यापूर्वी रोम, विम्बल्डन, तेल अविव, ऍस्टाना आणि आता एटीपी फायनल्स स्पर्धेतील अजिंक्मयपदे मिळविली आहेत. 2008 साली जोकोविचने शांघाय टेनिस स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविले होते. जोकोविचने यापूर्वी एटीपी फायनल्स स्पर्धेतील अजिंक्मयपदे 2008, 2012, 2013, 2014, 2015 आणि त्यानंतर 2022 साली जिंकली आहेत. एटीपी फायनल्समध्ये नॉर्वेचा रुड हा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला नॉर्वेयन टेनिसपटू आहे. 2022 च्या टेनिस हंगामाअखेर कास्पर रुड एटीपीच्या मानांकनात तिसऱया स्थानावर राहील.
या स्पर्धेत राजीव राम आणि जो सॅलीसबेरी यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्मयपद पटकाविले. राम आणि सॅलीसबेरी या जोडीने अंतिम सामन्यात निकोला मेकटिक आणि मॅटे पॅव्हिक यांचा 7-6 (7-4), 6-4 असा पराभव केला. एटीपी फायनल्समधील दुहेरीचे जेतेपद मिळविणारा सॅलीसबेरी हा ब्रिटनचा पहिला टेनिसपटू आहे. तर अमेरिकेचा राजीव राम हा अठरावा अमेरिकन टेनिसपटू आहे. या जेतेपदाबरोबरच राजीव राम आणि सॅलीसबेरी या जोडीने 1500 एपीटी मानांकन गुण मिळविताना 930,300 अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. टेनिस क्षेत्राच्या दुहेरीच्या प्रकारात सर्वाधिक बक्षीस घेण्याचा पराक्रम राम आणि सॅलीसबेरी या जोडीने केला आहे. दुहेरीत ही जोडी शेवटपर्यंत अपराजित राहिली आहे.