जोकोविच पराभूत, अॅन्ड्रीव्हा चौथ्या फेरीत
वृत्तसंस्था / माद्रीद
2025 च्या माद्रीद मास्टर्स खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचचे एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. या पराभवामुळे जोकोविचचे एटीपी टूरवरील 100 वे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. जोकोविचला इटलीच्या मॅटेव अरनाल्डीने पराभूत केले. पुरुष विभागात अॅलेक्स डी मिनॉर, कॅनडाचा शेपोव्हॅलो, मुसेटी, कॅमेरुन नुरी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. महिलांच्या विभागात रशियाच्या 17 वर्षीय मायरा अॅन्ड्रीव्हाने शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले.
पुरुष एकेरीच्या सामन्यात अरनाल्डीने 37 वर्षीय जोकोविचचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात जोकोविचने 32 अनियंत्रीत चूका केल्या. तर अरनाल्डीने तीनवेळा जोकोविचची सर्व्हिस भेदली. आता अरनाल्डीचा पुढील फेरीतील सामना डेमीर झुमूरशी होणार आहे. झुमूरने सेबेस्टीयन बाएझचा 1-6, 6-1, 6-2 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात सहाव्या मानांकित अॅलेक्स डी. मिनॉरने सोनेगोचा 6-2, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. मिनॉरचा पुढील सामना कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हशी होणार आहे. शेपोव्हॅलोने जपानच्या निशीकोरीचा 6-1, 6-4 असा फडशा पाडला. दहाव्या मानांकित मुसेटीने टॉमस इचेव्हेरीचा 7-6 (7-3), 6-2 तसेच ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीने लिहेकाचा 2-6, 6-4, 6-3 असा फडशा पाडत पुढील फेरीत प्रवेश केला. ग्रिकच्या सित्सिपसने स्ट्रफचा 3-6, 6-4, 6-3 असा पराभव केला.
महिलांच्या विभागात रशियाच्या 17 वर्षीय मायरा अॅन्ड्रीव्हाने शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविताना मॅगडेलिना फ्रेचचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अॅन्ड्रीव्हा येत्या मंगळवारी 18 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. तिचा पुढील फेरीतील सामना युक्रेनच्या स्टारोडुबेत्सेव्हा बरोबर होणार आहे. युक्रेनच्या स्टारडुबेत्सेव्हाने सॅमसोनोव्हाचा तीन सेट्समधील लढतीत पराभव केला. अमेरिकेच्या चौथ्या मानांकीत कोको गॉफने आपल्याच देशाच्या अॅन लीचा 6-2, 6-3 तर मॅडिसन किजने अॅना कॅलिनस्कायचा 7-5, 7-6 (7-3) असा पराभव केला. बेलिंडा बेन्सिक आणि डायना स्नायडेर यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित पुढील फेरी गाठली.