कोर्दाला हरवून जोकोविच उपांत्य फेरीत
महिला एकेरीच्या जेतेपदासाठी पेगुला-साबालेंकात अंतिम लढत
वृत्तसंस्था / मियामी गार्डन्स (फ्लोरिडा)
2025 च्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने अमेरिकेच्या सेबेस्टीयन कोर्दाचा एकेरीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. तर महिला एकेरीच्या जेतेपदासाठी अमेरिकेची जेसिका पेगुला आणि बेलारुसच्या आर्यना साबालेंका यांच्यात अंतिम लढत होईल.
पुरुष एकेरीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने कोर्दाचा 6-3, 7-6 (7-4) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. जोकोविचने यापूर्वी ही स्पर्धा सहावेळा जिंकली आहे. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना 90 मिनिटे चालला होता. 37 वर्षीय जोकोविचने आतापर्यंत विक्रमी 24 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे पटकाविली आहेत. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत दुखापतीमुळे तो सहभागी झाला नव्हता. जोकोविचचा उपांत्य फेरीचा सामना बल्गेरियाच्या डिमीट्रोव्हशी होईल. झेकच्या जेकुब मेन्सीकने या स्पर्धेत एकेरीची उपांत्यफेरी पहिल्यांदाच गाठताना फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव केला. मेन्सीकने हा सामना 75 मिनिटांत जिंकला. मेन्सीकचा उपांत्यफेरीचा सामना अमेरिकेच्या तृतिय मानांकीत टेलर फ्रित्झशी होणार आहे. टेलर फ्रित्झने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इटलीच्या मॅटो बेरेटेनीचे आव्हान 7-5, 6-7 (7-9), 7-5 असे संपुष्टात आणले.
महिला एकेरीमध्ये फिलीपिन्सची नवोदित टेनिसपटू अॅलेक्सेंड्रा इलाचे आव्हान उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने संपुष्टात आणले. उपांत्यफेरीच्या सामन्यात चौथ्या मानांकीत पेगुलाने इलाचा 7-6 (7-3), 5-7, 6-3 अशा तीन सेट्समधील लढतीत पराभव केला. हा सामना अडीच तास चालला होता. 19 वर्षीय इलाने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सीडेड खेळाडू इगा स्वायटेक, मॅडिसन किज तसेच ओस्टापेंको यांना पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. या उपांत्य लढतीत इलाने दुसरा सेट जिंकून रंगत आणली होती. पण तिसऱ्या सेटमध्ये पेगुलाने आपल्या अनुभवाच्या जोरावर इलाचे आव्हान संपुष्टात आणले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बेलारुसच्या आर्यना साबालेंकाने इटलीच्या पावोलिनीचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये 70 मिनिटांत फडशा पाडत अंतिम फेरी गाठली.