सुवर्ण पदकासाठी जोकोव्हिच-अल्कारेझ लढत
स्वायटेकला कास्य, सिनियाकोव्हा-मॅकहेक मिश्र दुहेरीत सुवर्ण
वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस या क्रीडा प्रकारात पुरूष एकेरीत सर्बियाचा नोव्हॅक जोकोव्हिच व स्पेनचा कार्लोस अल्कारेझ यांच्यात सुवर्ण पदकासाठी लढत होईल. महिलांच्या एकेरीत पोलंडच्या स्वायटेकने कास्य पदक मिळविले. मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक सिनियाकोव्हा व मॅकहेक यांनी पटकाविले.
पुरूष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 37 वर्षीय जोकोव्हिचने इटलीच्या लोरेंझो मुसेटीचा 6-4, 6-2 अशा सरळ सेटमध्ये फडशा पारडला. दुसऱ्या उपांत्य लढतीत स्पेनच्या 21 वर्षीय अल्कारेझने कॅनडाच्या फेलिक्स अॅलिसिमेवर 6-1, 6-1 असा सहज विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत जोकोव्हिच आणि अल्कारेझ यांच्यात अंतिम सामना झाला होता आणि अल्कारेझने जोकोव्हिचचा पराभव करत जेतेपद मिळविले होते. याचीच पुनरावृत्ती ऑलिम्पिकमध्ये होत आहे. अल्कारेझने 2024 च्या टेनिस हंगामातील फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धाही जिंकली आहे.
स्वायटेकला कास्यपदक
महिला एकेरीच्या सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने कास्यपदक पटकविले. कास्य पदकासाठीच्या झालेल्या सामन्यात स्वायटेकने स्लोव्हाकीयाच्या अॅना स्किमेडलोव्हाचा केवळ तासभराच्या कालावधीत 6-2, 6-1 असा पराभव केला. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पोलंडचे टेनिसमधील हे पहिले पदक आहे. चीनची झेंग क्विनवेन आणि क्रोएशीयाची डोना व्हेकीक यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल.
झेक प्रजासत्ताकच्या कॅटरीना सिनीयाकोव्हा आणि तिचा साथीदार मॅकहेक यांनी टेनिस या क्रीडा प्रकारात मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदकाविले. सिनीयाकोव्हा व मॅकहेक या जोडीने चीनच्या वेंग झिनयु व झेंग झिझेन यांचा 6-2, 5-7 (10-8) अशा सेट्समध्ये पराभव केला.