जोकोविचचे लक्ष्य 100 व्या जेतेपदावर
वृत्तसंस्था / माद्रीद
येथे होणाऱ्या 2025 च्या माद्रीद खुल्या पुरुषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉपसिडेड आणि विजेता जोकोविचचे तब्बल तीन वर्षांनंतर पुनरागमन होत आहे. जोकोविचने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एटीपी टूरवरील 99 स्पर्धा जिंकल्या असून आता तो 100 वे विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला असून जोकोविचला चौथे स्थान तर फ्रेंचच्या अल्कारेझला दुसरे स्थान मानांकनात देण्यात आले आहे. महिलांच्या विभागात साबालेंकाला अग्रस्थान देण्यात आले आहे.
स्पेनची माद्रीद ही राजधानी असून 37 वर्षीय जोकोविचने 2022 साली आपला या स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. 2022 साली या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात अल्कारेझने जोकोविचला पराभूत केले होते. जोकोविचने एटीपी टूरवरील आपले 99 वे विजेतेपद पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मिळविले होते. त्यानंतर त्याला चार स्पर्धांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या महिन्यात मियामी टेनिस स्पर्धेत त्याचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. एटीपी टूरवरील स्पर्धेत 100 अजिंक्यपदे मिळविणाऱ्या टेनिसपटूंच्या यादीत अमेरिकेचा जिमी कॉनर्स (109), स्वीसचा रॉजर फेडरर (103) हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. जोकोविचने 2011, 2016 आणि 2019 साली माद्रीद टेनिस स्पर्धा जिंकली होती.
महिलांच्या विभागातील ड्रॉ काढण्यात आला. या स्पर्धेत साबालेंकाला टॉपसिडींग देण्यात आले आहे. दुखापतीमुळे या स्पर्धेत क्रेसीकोव्हा सहभागी होणार नाही. साबालेंकाने 2021 आणि 2023 साली माद्रीद स्पर्धा जिंकली होती.