दिया, मनुष, मुखर्जी भगिनी दुसऱ्या फेरीत, श्रीजा पराभूत
वृत्तसंस्था/ दोहा, कतार
येथे सुरू असलेल्या टेबल टेनिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची नंबर वनची टेटेपटू श्रीजा अकुला पहिल्याच फेरीत पराभूत झाली असली तरी भारतीय पथकातील अन्य खेळाडूंनी बऱ्यापैकी यश मिळविले. दिया चितळे व मनुष शहा यांनी महिला व पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.
ऐहिका मुखर्जी व सुतीर्था मुखर्जी या बहिणी आणि दिया चितळे व यशस्विनी घोरपडे यांनी महिला दुहेरीत विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. त्याचप्रमाणे पुरुष दुहेरीत मानव ठक्कर व मनुष शहा यांनीही पहिल्या फेरीत यश मिळविले. महिला एकेरीत भारताच्या अकुलाला थायलंडच्या सुथासिनी सविताबटकडून 1-4 (11-9, 8-11, 6-11, 5-11, 2-11) असा पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत 84 व्या स्थानावर असणाऱ्या अकुलाने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती. पण त्यानंतर तिला हा जोम टिकविता आला नाही आणि ही लढत तिला 33 मिनिटांत गमवावी लागली.
उर्वरित खेळाडूंनी मात्र भारताला यश मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती जोडी ऐहिका व सुतीर्था मुखर्जी या बहिणींनी तुर्कीच्या ओझ्गे यिल्माझ व इस हाराक यांच्यावर 3-2 (4-11, 11-9, 10-12, 11-9, 11-7) अशी पाच गेम्सच्या रोमांचक लढतीत मात केली. भारताने या लढतीत विजय मिळवून सहा सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली आणि आयटीटीएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आगेकूच केली.
दिया चितळे व यशस्विनी घोरपडे यांनीही दुसरी फेरी गाठताना उझ्बेकच्या मॅग्डीव्हा व एर्केबाएव्हाचा 3-1 (9-11, 11-2, 11-9, 11-8) असा पराभव केला. दिया-यशस्विनी यांनी पहिला गेम गमविला होता. पण लय सापडल्यानंतर ही पिछाडी भरून काढत शानदार विजय नोंदवला. पुरुष दुहेरीत मानव ठक्कर व मनुष शहा यांनी या मोसमातील चांगला फॉर्म पुढे चालू ठेवत दुसरी फेरी गाठली. त्याने स्लोव्हेनियाच्या डेनी कोझुल व पीटर ऱ्हायबर यांच्यावर 3-0 (11-7, 11-8, 11-6) अशी मात केली. त्यानंतर सायंकाळी मनुष शहाने एकेरीच्या सामन्यात पोर्तुगालच्या तियागो अपोलोनियाला 4-2 (11-6, 2-11, 11-7, 11-6, 5-11, 11-6) असे नमविले. युवा खेळाडू दिया चितळेने महिला एकेरीत स्पेनच्या साफिया झुआन झँगवर 4-0 (11-4, 11-7, 11-3, 14-12) अशी एकतर्फी मात केली.