For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळी....अंधाराचा महोत्सव

06:23 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
दिवाळी    अंधाराचा महोत्सव
Advertisement

एकदा एका रात्री एका छोट्या मुलाने ओंजळीमध्ये काहीतरी लपवून आपल्या आईसाठी आणले, त्या ओंजळीत अंधार भरून होता. तो त्याच्या आईने पाहिला आणि त्याच्या हातात काहीतरी ठेवल्याची कृती केली आणि सांगितलं तुझी ओंजळ आता डोळ्यासमोर धर आणि काय दिसते सांग बरं. त्याने पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बोटाच्या फटीतून किंचित उजेडाच्या रेघा आत येत होत्या. ते पाहून त्याला इतका कमालीचा आनंद झाला की आपण आणलेल्या अंधारात असं काहीतरी चमचमतं आपल्याला सापडणार आहे ही कल्पनाच त्याला खूप खुश करत होती.

Advertisement

आता तो उद्याच्या अंधाराची वाट पाहू लागला होता. असाच अंधार आपल्याला प्रत्येक दिवाळीतसुद्धा हवाहवासा वाटतो. त्याचं कारण असे आहे या अंधारामध्ये काय काय दडलेलं असतं? हे दाखवणारा हा सण. आपण सगळेच अंधाराच्या राज्यातून आलेलो असतो आणि अंधाराच्या राज्यातच पुन्हा जाणार असतो. तरीदेखील अंधार आणि काळा रंग याबद्दल आमच्या मनात कायमच एक प्रकारची भीती नांदत असते. अमावस्या आली तरी आम्ही त्याला अशुभ मानतो पण दिवाळीच्या वेळेला आलेली ही अमावस्या आमच्या साऱ्या वर्षभराच्या सणांना शुभलक्ष्मीच्या पायघड्या घालते. म्हणूनच ही एकमेव आवस अशी आहे की ज्याचे उत्सव होतात. खरंतर अंधाराचेच महोत्सव आम्ही जन्मापासून साजरे करत आलेलो असतो, पण दिवाळीचं मात्र एक वेगळेच अप्रूप वाटतं. दिवाळी म्हटले की यमाचा विषय ठरलेला कारण यमद्वितीया भाऊबीजेला यमीला यमाने ओवाळणे ... या सगळ्या कथा आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत. म्हणजेच यमधर्माचेच महात्म्य या दिवाळीमध्ये सांगितले जाते. दिवाळीचा उत्सव म्हणण्यापेक्षा यम धर्माचा महोत्सव असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या महोत्सवात आम्हाला पुढच्या वर्षभर येणाऱ्या सगळ्या सणांचे जसे आकर्षण असते तसेच यमधर्मात देखील जन्मानंतर पुढे येणाऱ्या पुढच्या जन्माचेसुद्धा आकर्षण असते. म्हणून हे महोत्सव व्हायलाच हवे असे आशेचे किरण दाखवणारा हा सण म्हणून आमचा सगळ्यांचा खटाटोप सुरू असतो पण कित्येकदा या उजेडामुळे मनाला मोह होतो त्या अंधाराचा. कारण अंधारातच फुलांचे रंग विकसित होत असतात. त्याचे गंध मोहरत असतात, दवबिंदूंची शिंपण सुरू असते. या साऱ्या चराचराला चैतन्याचे जणू वाटपच इथे सुरू झालेले असते. अगदी एखाद्या तलम मऊसर चांदण्यांच्या टिकल्या लावलेल्या अंधाराच्या पडद्यात ही सगळी कामं अविश्रांत सुरू असतात. बोचऱ्या थंडीमुळे अनेक झाडांवरची पानं वेगवेगळ्या रंगाचे साज लेवून आता वेगळ्याच वाटेला निघालेले असतात. अगदी एखाद्या झाडाने अलगद आपल्या अंगावरचे सगळे दागदागिने उतरवावेत तसा हा सगळा महोत्सव. काजव्यांचा वावर आजूबाजूला सुरू होतो, हे सगळं बघण्याची घाई प्रत्येक कीटकाला झालेली असते. प्रत्येक कीटक अंधारात काहीतरी शोधत निघालेला असतो. अगदी कात टाकणारे सरपटणारे प्राणीसुद्धा रात्रीच शुचिर्भूत होत असतात. काहीना अंधारातच शिकारीचे बेसावध क्षणसुद्धा सापडतात.

पूर्वार्ध

Advertisement

Advertisement
Tags :

.