Sangli :आरोग्यच्या 35 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी वेतन अडचणीत
दिवाळीच्या आधी पगार न मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
सांगली : केंद्र सरकारने निधी दिल्यानंतरही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतील ३५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बेतनाविना साजरी करावी लागत आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक कारणास्तव वेतन जमा होऊ शकले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत उधार-ऊसनवार करावी लागली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यभरात कार्यरत असणाऱ्या ३५ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी काळी ठरली आहे. त्यांच्या वेतनाविषयी वित्त विभागाने अचानक जारी केलेल्या आदेशामुळे संपूर्ण यंत्रणा गोंधळात सापडली आहे. १६ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचे वेतन दावे त्याच दिवशी रात्रीपर्यंत कोषागारात पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सर्व पगारपत्रके १६ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत सादर न झाल्यास केंद्राचा हिस्सा लांबणीवर पडण्याची शक्यता होती. मात्र राज्यभरातील कर्मचाऱ्यांची पगार पत्रके एकाच दिवशी जमा होणे मुश्किल असल्याचे अधिकारी व कर्मचायांचे म्हणणे आहे. वेतनासाठीची ई-स्पर्श ही नवीन आर्थिक प्रणाली वेळीच कार्यान्वित न झाल्याने वेतन अडकून पडले. केंद्र सरकारने पगाराचा निधी अन्यत्र वळविल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रशासनाने युद्धस्तरावर काम केले. दिवाळीच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत बसून पगारपत्रके सादर केली, तरीही हे काम एका दिवसात पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी दिवाळीला कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. सलग तिसऱ्या महिन्यातही आरोग्य सेवकांना वेतनापासून वंचित रहावे लागले.
यामुळे राज्यभरातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, तांत्रिक अधिकारी आणि प्रशासनिक कर्मचारी यांना वेतनाबिना दिवाळी साजरी करावी लागत आहे.