For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतांची दिवाळी !

06:30 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
संतांची दिवाळी
Advertisement

साधू संत येती घरा । तोची दिवाळी दसरा ।। असे ज्या ज्यावेळी साधू संत अथवा एखादी महान व्यक्ती आपल्या घरी आली की आपण म्हणतो मग तो वर्षातील कोणताही दिवस का असेना. भागवत धर्मामध्ये कार्तिक महिना हा विशेष उत्सवांचा महिना आहे. या महिन्यात श्रीराम अयोध्येमध्ये परतले म्हणून अयोध्यावासियांनी त्यांचे घराघरामध्ये दीप प्रज्वलित करून आणि आकाशकंदील लावून स्वागत केले. तो हा दीपावलीचा दिवस. दीप हे ज्ञानाचे प्रतीक आहे, अंधकार हे अज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून जेथे ज्ञान आहे तेथे आनंद आहे आणि अज्ञान आहे तेथे दु:ख आहे. संतांना म्हणजेच हरिभक्तांना सामान्य जन जे देहात्म बुद्धीने आंधळे झाले आहेत, ज्याला आनंद म्हणून संबोधतात ते वास्तविक दु:खच वाटते कारण अशा तथाकथित आनंदाचा परिणाम अंतत: दु:खामध्येच होत असतो म्हणजे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही दु:खे पुन: पुन्हा भोगावी लागतात. पण हरिभक्तांना या दु:खातून कायमचे मुक्त कसे व्हायचे याचे रहस्य माहिती असते व त्याचा ते सामान्य लोकांना प्रचार करीत असतात. म्हणून असे हरिभक्त घरी आले की खरा दिवाळीचा आनंद प्राप्त होतो. हरिभक्तांच्या घरी येण्याने तेथे हरिकथा, हरिकीर्तन, हरिसेवा, हरिप्रसाद या सनातन आनंद देणाऱ्या भगवद्सेवेमध्ये सामान्य लोकही सहभागी होऊ शकतात.

Advertisement

सामान्य लोक इंद्रियतृप्तीलाच आनंद मानतात कारण त्यांना हरिभक्तीमधील आनंदाचा अनुभव नाही. परंतु हरिभक्त संत हा आनंद क्षणोक्षणी अनुभवत असतात. त्यांना दसरा दिवाळीची वाट पहावी लागत नाही. हरिभक्तांचा आनंद वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, पूर आला आनंदाचा। लाटा उसळती प्रेमाच्या।।1।।बांधू विठ्ठलसांगडी। पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ।।ध्रु।। हें तों नाहीं सर्वकाळ। अमुप अमृतांचें जळ ।।2।।तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ।।3।। अर्थात ‘हरीच्या भजनाने आनंदाचा मोठा पूर आला असून भगवद्प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. यासाठी विठ्ठलनामाची आपण सांगड बांधू आणि संसारसागराच्या पैलतिरी पोहून जाऊ. अवघे जन, माझे सवंगडी म्हणून माझ्याबरोबर या, आपण विठ्ठलनामाच्या साहाय्याने संसार सागर पार करून जाऊया. हरिच्या नामाचा आनंद हा केवळ मनुष्य जन्मातच प्राप्त होतो, हा सर्वकाळ प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक जन्माचे पुण्य म्हणून हा विठ्ठल भक्तीचा ओघ मनुष्य जन्मात प्राप्त झाला आहे.’

स्वत: भगवान श्रीकृष्ण जे सर्व आनंदाचे उगमस्थान आहेत आणि ज्यांच्यामुळे हरिभक्तांना आनंद प्राप्त होतो ते म्हणतात (भ गी 10.9) मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्त: परस्परम् । कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च । अर्थात ‘माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो.’ असा आनंद प्राप्त करणे म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे. आजकाल आपण बाह्यार्थाने दिवाळी साजरी करतो परंतु त्यामागील आध्यात्मिक हेतू विसरून जातो. खरी दिवाळी आहे भगवंताच्या अनेक लीला उदाहरणार्थ गोवर्धन लीला,  उखळ बंधन लीला, रामाचे अयोध्येस परतणे, भौमासुराचा वध करून श्रीकृष्णाने सोळा सहस्र स्त्रियांशी विवाह केला इत्यादी दिव्य लीलांचे स्मरण करणे आणि हरिचिंतनातील आनंद प्राप्त करणे. हरिभक्त स्वत: अशा प्रकारे आनंद प्राप्त करतात आणि सामान्य जनांनाही त्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतात म्हणून असे संत ज्यावेळी घरी येतात तेव्हा दसरा दिवाळीचा खरा आनंद प्राप्त होतो.

Advertisement

म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात  धन्य आजि दिन । झालें संतांचें दर्शन ।।1।।जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ।।ध्रु।।जालें समाधान । पायीं विसांवले मन ।।2।।तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ।।3।।अर्थात ‘आजचा दिवस धन्य आहे कारण संतांचे दर्शन झाले. त्यांच्या दर्शनाने पाप, ताप तसेच दैन्य याची तुटातुटी झाली आहे. माझे समाधान झाले असून तुमच्या पायाशी माझे मन विसावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दिवशी संत घरी येतात, तो दिवस दिवाळी व दसरा आहे.

दिवाळी कशी पाळावी याबद्दल उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात, आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ।।1।।तेणें माझें चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें।।ध्रु।।व्रत एकादशी दारिं वृंदावन । कंठीं ल्यारे लेणें तुळसीमाळा।।2।।तुका म्हणे त्याचे घरिंची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण ।।3।।अर्थात ‘आम्हाला जर काही द्यायचेच असेल तर ते मी तुमच्या कानामध्ये सांगतो. ते म्हणजे असे की, तुम्ही विठोबाच्या पायाचे चिंतन मनामध्ये करत रहा. एवढे जरी तुम्ही मला दिले तरी त्या योगाने माझ्या चित्ताला समाधान होईल मग मला तुमचे मिष्ठान्न, विलास, सोने वगैरे काहीच नको. तुम्ही एकादशी व्रत करा, दारामध्ये तुळशी वृंदावन राहू द्यावे, कंठामध्ये हरिनाम धारण करा आणि गळ्यामध्ये तुळशीमाळेचे लेणे परिधान करावे. तुकाराम महाराज म्हणतात, जर असे या नियमाने कुणी वागले तर माझ्यासाठी तो दिवाळी दसरा सणच वाटेल.’

दुसऱ्या एका अभंगात संतांची भेट म्हणजे दिवाळी का वाटते याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, दसरा दिवाळी तोचि आम्हां सण । सखे संतजन भेटतील ।।1।। आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ।।ध्रु।।धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ।।2।।तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेवू पांयीं संतांचिये ।।3।।अर्थात ‘ज्या दिवशी मला हरिभक्त भेटतील तोच दिवस माझ्यासाठी दसरा आणि दिवाळीसारखा आहे. ज्या दिवशी मला सखे हरिजन भेटतील त्या दिवशी माझ्या अनेक पुण्याच्या राशी जोडल्या जातील आणि त्या सुखाला अंत:पारही राहणार नाही व त्या सुखाची सर इतर कोणत्याही सुखाला देता येणार नाही. आज मला सखे हरिजन भेटले त्यामुळे आजचा दिवस सोन्याचा झाला आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये माझ्या वाणीलादेखील रामनामाचे पीक भरपूर आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या या उपकारातून कसा काय उतराई होऊ शकतो परंतु मी माझा जीव त्यांच्या पायावर ठेवू शकतो.’

हरिभक्तीमध्ये दिवाळीला मिळणारा आनंद कायमच प्राप्त होतो, मग असा आनंद आपण का प्राप्त करू नये, असा प्रŽ विचारताना तुकाराम महाराज म्हणतात, आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ।।1।।विठोबाचीं वेडीं आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचों वाहु टाळी रंजवू गोविंदा ।।ध्रु.।। सदा सण  सांत आम्हा नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ।।2।।तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक हे तो आमुचें कवतुक।।3।।अर्थात ‘आज आम्हाला आनंद झाला आहे कारण आम्हाला परमानंदाची प्राप्ती झाली आहे. ज्या गोविंदाला श्रुती, नेती नेती म्हणत आहेत त्या गोविंदाची प्राप्ती आम्हाला झाली आहे. आम्ही विठोबाची वेडी मुले आहोत. त्यामुळे आम्हाला नेहमी आनंदच आहे. आम्ही विठोबाचे नाम गाऊ, त्याच्या आनंदात नाचू, नृत्य करू व टाळी वाजवून गोविंदाला रंजवू. आनंददायक दिवाळीसारखा सण आमच्याजवळ नेहमीच आहे. अशा प्रकारे आमच्या ठिकाणी गोविंदाचा आनंद परिपूर्ण भरलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जन्ममरणाचे भयच नाही कारण संत सनकादिक हेच आमचे कौतुक आहेत.’ अशा प्रकारे संतांच्या उपदेशाप्रमाणे दिवाळी सण आपल्या आयुष्यात दररोज साजरा करून परमानंदाची प्राप्ती करून घेण्याची संधी या मनुष्य जन्मात प्राप्त झाली आहे.

-वृंदावनदास

Advertisement
Tags :

.