महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिवाळीचे दिवे

06:41 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रकाशाचा चैतन्य उत्सव अर्थात दिवाळीला प्रारंभ झाला आहे. दिवाळीला सणाचा महामहोत्सव म्हटले जाते आणि ते अनेक अर्थाने खरे आहे. दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. खरिपाचे धनधान्य घरी येते आणि कृषि संस्कृतीचा आणि कुटुंब व्यवस्थेचा गौरव करत नातेसंबंधाचा गोडवा गेंजरत सणाची महाराणी दिवाळी येते. तन-मन-धन-रंग-गंध-ध्वनी-स्वाद-आरोग्य-निसर्ग आणि एकरुपता, समरसता यांचा पाया भक्कम करत दिवाळीचे प्रकाशपर्व अवतरते. लहान-मोठे, कष्टकरी, कामकरी यांच्यापासून श्रीमंत नवकोट नारायण सारे आनंदात असतात आणि नव्या व्यापारी वर्षाला प्रारंभ होतो. खरेतर हा प्रकाशाचा उत्सव सर्व दिशांनी येणारा प्रकाश प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचला जावा आणि अंतरीचे दिवे प्रज्वलित होत सारा अंध:कार नष्ट व्हावा यासाठी आपल्या संस्कृतीने, परंपरेने पिढ्यान्पिढ्या जपलेला हा उत्सव आहे. त्यापाठीमागे पौराणिक कथाही आहेत. खरेतर गोपूजनाने वसुबारसेला या उत्सवाची सुरुवात होते. धनतेरस अर्थात धनत्रयोदशीला धान्य आणि धन्वंतरी पूजेने या उत्सवाला पहिला दिवा लागतो आणि मग अभ्यंगस्नान, देवदर्शन, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे उत्सवाचे आणि नात्यांचा गोडवा वाढवणारे अनेक उपक्रम असतात. उस तोडणी मजुरांच्या झोपडीवरही आकाशकंदील असतो आणि पंचतारांकित बंगल्यावरही रोषणाई असते. घराघरात फराळ बनवला जातो. फराळाची ताटे, मिठाईचे बॉक्स एकमेकांना दिले जातात. अभ्यंगस्नानाने आयुर्वेदाशी नाते जोडले जाते. भाऊ-बहीण, नवरा-बायको, आई-वडील आणि मुले, ज्येष्ठ, गोरगरीब, कामगार साऱ्याचा नाते आणि महत्व या दिवाळीत अधोरेखित केले जाते. तन-मनाची, धनाची स्वच्छता आणि नवी स्वप्ने, नवे संकल्प घेऊन प्रकाशपर्वाचे स्वागत करतात. यंदाही तोच उत्साह, तोच जोम व गोडवा असला तरी त्याला पर्यावरणपूरक हा नवा आयाम जोडला गेला आहे. सर्वस्तरातील अंधार नष्ट होऊन प्रकाशाचे स्वागत होत आहे आणि तोच हेतू आहे. पण दिवाळीचे दिवे आणि रोषणाई समजून घेतली पाहिजे. कोरोना व आर्थिक ठप्प झालेली जगाची गाडी आता पूर्वपदावर आली आहे. देशभराची दिवाळी आणि मराठी जगतातील दिवाळी यामध्ये आणखी एक फरक आहे तो म्हणजे दिवाळी अंकाचा शंभर वर्षापूर्वी मनोरंजन या मासिकाने पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला आणि आता ती परंपरा म्हणजे अक्षरदीप परंपरा बनली आहे. मराठीत लहान-मोठे सात-आठशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. यामध्ये करमणुकीपासून कथापर्यत आणि कवितापासून लेखापर्यंत अनेक गोष्टी असतात. भविष्य, हास्यचित्रे, व्यंगचित्रे यामुळे हे अंक दिवाळीला चकली-कडबोळीच्या बरोबरीने कुरकुरीत करतात आणि अभ्यंगस्नानाइतकेच ताजे-तजेलदार करतात. त्यामुळे खाद्यपदार्थ्यांच्या जोडीने हे अक्षरदीप घरोघरी आणले जातात. तरुण भारतचाही दणदणीत, दिमाखदार दिवाळी अंक घराघरात पोहोचला आहे. भारतीय सण-परंपरा आणि निसर्ग, ऋतू, पर्यावरण याचा निकटचा संबंधच नव्हे तर त्यांची जोड असते. यानिमित्ताने लक्ष्मीचा वास घराघरात, सर्वाठायी व्हावा अशी रचना असते. काळानुरुप काही चांगले व गरजेचे बदल होत आहेत व ते स्वागतार्ह आहेत. ध्वनीप्रदूषण, वायुप्रदूषण यांना आळा घालत दिवाळी पर्यावरणपूरक केली जाते आहे. ही सुधारणा हळूहळु आहे पण निश्चितच चांगली पावले पडत आहेत. या सणाच्या काळात सीमेवर लढणारे जवान, एस.टी बसेस, रेल्वे वगैरेचे कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस यांची जाण ठेवली जाते. त्यांच्या त्यागाची, सेवेची दखल घेतली जाते. उसतोडणी मजूर, रस्ते बांधकामावरील परप्रांतीय मजूर, अनाथ, आजारी, गरीब, वयोवृद्ध यांच्यासाठी प्रत्येक मनात एक दीप तेवत असतो हा संवेदनदीप खरा प्रकाशदीप असतो. या दिव्याच्या लख्ख प्रकाशात माणुसकी, नातेसंबंध उजळून निघतात. कुटुंबव्यवस्था बळकट होते आणि तोच या उत्सवाचा खरा अर्थ आहे. यंदा दिवाळी निमित्ताने अनेक आव्हाने आणि संधी दिसत आहेत. उघडे डोळे आणि सकारात्मक विचार घेऊन जो निर्धाराने चालेल. त्यांच्यासाठी नवे वर्ष संधी घेऊन येत आहे. कोरोनानंतरचे जग आगळेवेगळे आहे. नवे शोध, नवे तंत्रज्ञान यामुळे जीवनाच्या सर्वक्षेत्रात मोठे बदल होत आहेत. सुधारणा, आर्थिक उन्नती याचे तपशील आणि शेअरबाजाराचे नव-नवे विक्रम चकीत करणारे असले तरी बेरोजगारी वाढत आहे. प्रदूषित वसुंधरेमुळे माणसांना तडाख्या मागून तडाखे बसत आहेत. सुरक्षित, चकचकीत मोठ्या पगाराच्या नोकऱ्यावर डोळा ठेऊन सुखाची दारे ठोठवणारे वाढत आहेत. तथापि शेती, आरोग्यसेवा, वाहतूक यासह अनेक क्षेत्रात तंत्रज्ञान झपाट्याने वाढले आहे.  चालकविरहित गाड्या, रेल्वे, वर्कफ्रॉम होम, ऑनलाईन एज्युकेशन, ग्रीन एनर्जी, खासगीकरण यामुळे बेकारीची कुऱ्हाड टांगती आहे. ज्यांनी नवे तंत्रज्ञाान आत्मसात केले तोच टिकणार. अशावेळी प्रगत, उन्नत आणि तंत्रज्ञानासह अर्थकारण, समाजकारण यात अग्रेसर राहणारेच टिकणार. हे नवे जग समजावून घेऊन त्यावर स्वार झाले पाहिजे. सेवा, उद्योग, शेती व कारखानदारी यातील रोबो तंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी यामध्ये तरुणांना नव्या संधी आहेत. रोज नवे समजून घेतले पाहिजे. आत्मसात केले पाहिजे व त्यावर स्वार झाले पाहिजे. पारंपरिक कौशल्ये मागे पडत आहेत यांची जाण ठेवून नव्याचे स्वागत केले पाहिजे. सर्व दिशांनी येणारा नवा प्रकाश समजून घेतला पाहिजे व तो अंगीकारुन नव्या जगात आघाडीवर राहिले पाहिजे. आरक्षणाचे लढे सरकारी तिजोरीवरचा भार आणि गरिबांना न्याय यांना निर्विवाद महत्त्व आहे. पण त्यापलिकडे जाऊन शाश्वत विकास साधायचा. जगात अव्वल स्थान निर्माण करायचे तर नवी कौशल्ये, नवे विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. उद्याचे जग त्यांचे आहे. जो हे करेल तोच पुढे जाईल. उद्याचा इतिहास लिहित यासाठी चांगले शिक्षण, चांगले संस्कार, चांगली कौशल्ये आणि आदर्श जीवनपद्धती अवलंबली पाहिजे. यंदाच्या प्रकाशपर्वाचा तोच अर्थ आहे. निसर्ग जपा, मानवता बळकट करा, ज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण यामध्ये व्यापक कौशल्य आत्मसात करा. उद्याचे जग तुमचे असेल. तुम्हाला जगभरात रेडकार्पेट अंथरले जाईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article