लक्ष लक्ष दीप उजळले
आज अभ्यंगस्नानाची पर्वणी : उद्या लक्ष्मीपूजन : खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी
बेळगाव : घरोघरी दीपज्योती प्रज्वलित करणारा, तेजोमय प्रकाशाने अंधारावर मात करणारा पारंपरिक सण दिवाळीमुळे सर्वत्र उत्साही वातावरण आहे. मांगल्य, उत्साह आणि नवचैतन्य घेऊन येणाऱ्या दिवाळीला अर्थातच वसुबारसपासून सुरुवात होते. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी सणाची ओळख आहे. हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. आज सोमवारी नरक चतुर्दशी असून नरकाच्या भयातून मुक्ती मिळून जीवन जगण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. अभ्यंगस्नानाची आज पर्वणी असून या पार्श्वभूमीवर बेळगाव बाजारपेठेत खरेदीचा उत्साह दिसून आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारपेठेत खरेदीसाठीची लगबग दिसून आली. दिवाळीचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत.अभ्यंगस्नानासाठी उटणे, सुवासिक साबण, सुगंधी तेल, कपडे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी उत्साह दिसून आला. याबरोबरच नरक चतुर्दशी दिवशी कारिट फोडण्याची प्रथा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला ठिकठिकाणी कारिट विक्री करीत असल्याचे दिसून आले.
फराळांच्या दुकानांमध्ये गर्दी
दिवाळी म्हणजे फराळ हा आलाच. सध्या नोकरदार महिलांची संख्या वाढली असल्याने तयार फराळाकडे महिलांचा कल अधिक आहे. त्यामुळे तयार फराळ खरेदी करण्यासाठी रविवारी झुंबड उडाली होती. करंजी, चकली, शंकरपाळी, अनारसे, लाडू, शेव, चिवडा यांसह इतर फराळ खरेदी केला जात होता. त्यामुळे फराळाचा घमघमाट बाजारपेठेत दरवळत होता. तसेच घरोघरी फराळ करण्यामध्येही गेले चार दिवस महिलांची लगबग होती.
आकाशकंदील, सजावटीचे साहित्य
बाजरपेठेत उटणे, सुवासिक साबण, तेल, आकाशकंदील, सजावटीचे साहित्य, लायटिंगच्या माळा विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. याबरोबरच पूजेसाठी लागणारे साहित्य, झेंडूची फुले, पणत्या विक्री केल्या जात होत्या. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड या परिसरात रस्त्या शेजारी स्टॉल मांडण्यात आले होते. त्यामुळे खरेदीसाठी सर्वत्र झुंबड उडाली होती.
मिठाईच्या खरेदीसाठी स्वीटमार्टमध्ये गर्दी
मिठाईच्या खरेदीसाठी स्वीटमार्टमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले. आपल्या आप्तेष्ट मंडळींना मिठाई देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु होती. काही स्वीटमार्टनी तयार मिठाईचे बॉक्स समोर डिस्प्ले केले होते. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांना सोईचे होत होते. 100 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत स्वीटबॉक्सची विक्री केली जात होती. रेग्युलर मिठाईसोबत ड्रायफ्रुट्स मिठाई बाजारात उपलब्ध झाली आहे.
लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांची लगबग
लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा-दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेसाठी बाजारपेठा सज्ज आहेत. विशेषत: वस्त्रदालने, भांड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची दालने ग्राहकांसाठी सिद्ध आहेत. आता खऱ्या अर्थाने बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी होणार आहे. शहरात प्रत्येक आस्थापनेत लक्ष्मीपूजनाचा सोहळा मोठा होतो. हा व्यापारी वर्गासाठी महत्त्वपूर्ण सण असल्याने दुकाने, आस्थापनांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अर्थातच लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांची लगबग सुरू आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनात गर्दी
जीएसटी कमी झाल्याने मोबाईल, फ्रीज,वॉशिंग मशीनसह दुचाकी, चारचाकी वाहनांच्या दरातही घट झाली आहे. शिवाय बऱ्याच आस्थापनांनी बंपर सेल जाहीर केले आहेत. दिवाळीनिमित्त सवलतींची खैरात होत असल्याने दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच वाहने खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ वाढला आहे.