तरुण भारत बेळगाव आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
उत्तमोत्तम साहित्याची पर्वणी : अंक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरण्याचा विश्वास
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीच्या खमंग, खुसखुशीत फराळाबरोबरच वैचारिक साहित्याचा फराळही हवाच. याच हेतूने ‘तरुण भारत’ 1948 पासून दिवाळी अंक प्रकाशित करत आहे. यंदा या दिवाळी अंकाच्या बरोबर स्थानिक पातळीवरही दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचे प्रकाशन शनिवारी ‘तरुण भारत’च्या नार्वेकर गल्ली येथील कार्यालयात करण्यात आले.
संपादक विजय पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापक गिरीधर शंकर, सीएमओ उदय खाडिलकर, मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक सोहन पाटील व प्रिंटिंग विभागाचे प्रमुख धैर्यशील पाटील उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना मनीषा सुभेदार यांनी दिवाळी अंकाच्या परंपरेची माहिती दिली. 1909 मध्ये का. र. मित्र यांनी दिवाळी अंक प्रकाशित केला. ते टपाल खात्यात असल्याने ख्रिसमसच्या निमित्ताने परदेशात प्रसिद्ध झालेला ‘जॉय ऑफ लंडन’ हा अंक त्यांना पाहायला मिळाला. त्यावरून त्यांना दिवाळी अंकाची कल्पना सुचली. आज मराठी भाषेमध्ये 600 हून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात, असे त्यांनी सांगितले.
या अंकामध्ये किरण येले, संजय पवार, लक्ष्मी यादव, उमा कुलकर्णी, डॉ. संध्या देशपांडे, मेधा मराठे, विनोद गायकवाड, संजय रानडे यांच्या उत्तमोत्तम साहित्याने हा अंक नटला आहे. यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचा त्यांनी कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला. ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध झालेला हा अंक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपादक विजय पाटील यांनी अंकातील साहित्याचा आढावा घेतला. यंदा ‘तरुण भारत’च्या सर्वच आवृत्तींतर्फे कॉर्पोरेट अंकाबरोबरच स्थानिक पातळीवर दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यात आले असून या अंकांची वाचकांनी आगावू नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. उदय खाडिलकर यांनी, या अंकाची संकल्पना किरण ठाकुर यांनी मांडली. त्याला जाहिरात विभागाने प्रतिसाद देत उत्तम कामगिरी केल्याचे नमूद केले. गिरीधर शंकर यांनी आभार मानले.