For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळी ही ग्रामीण कृषी संस्कृतीची जीवनदृष्टी

11:17 AM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिवाळी ही ग्रामीण कृषी संस्कृतीची जीवनदृष्टी
Advertisement

जीवन प्रकाशमय करणारी दीपावली म्हणजे शाश्वत, समृद्ध, न्याय समाजाची ग्रामीण माणसाची स्वप्नपूर्ती

Advertisement

अरूण टुमरी/काकती 

दिवाळी ही एक संपूर्ण कृषी-संस्कृतीची जीवनदृष्टी आहे. निसर्ग, पशुधन आणि मानवी श्रम यांच्यातील अतूट नात्याचा उत्सव साजरा करते. कर्नाटक, महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा दिवाळी सणामागील खऱ्या अर्थाचा गाभा आहे. यातील काही प्रथा वेगळ्या वाटल्या तरी त्या एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत. ‘इडा पिडा टळू दे.. बळीचे राज्य येऊ दे...’ अशी इच्छा व्यक्त करत माता, भगिनी या सणात कुटुंबातील लहानथोरांना ओवाळतात. या सर्व परंपरांचा मूळ उद्देश कृतज्ञता, समृद्धीचे स्वागत आणि आदर्श राजाची आकांक्षा हा आहे. सोमवार दि. 20 रोजी नरकचतुर्थी साजरी करण्फात आली.

Advertisement

या दिवशी वामनानं दान मागावं आणि बळीनं ते द्यावं... ही केवळ प्राचीन पौराणिक कथा नाही. तर तो दुष्ट आणि सुष्ट यांच्यातील प्रवृत्तीचा संघर्ष आहे. वामन स्वार्थाच प्रतिक आहे. तर बळी हे नि:स्वार्थीपणाच प्रतिक आहे. म्हणून बळीराजाच्या नावाला अर्थ आणि गौरव झाला आहे. सामाजिक न्यायाने बळी थोर ठरला आहे. बळीराजाच्या मनात जी समानता होती तीच दिव्यांच्या उजेडात, प्रकाशात आहे. दुष्ट नितीने वामनाने बळीच्या मस्तकावर पाऊल ठेवले हे बळीराजाच्या स्मरणाचे पवित्र प्रेरणादायी पर्व आहे. म्हणून बुधवारी बलिप्रतिपदे दिवशी शेणाने अंगण सारवून रांगोळी घालून गौळणी घालण्यात येते.

तर माजघरातील उकळासभोवती शेणाने तयार केलेल्या गौळणी झेंडूच्या फुलांनी सजवितात. दह्याच्या मडक्यात ताक, लोणी काढण्यासाठी घुसळण्यासाठी रवि ठेवण्यात येते. धान्य कांडण्याचे मुसळ, कस व भात पिकांच्या लोंबांची आरास सजवून पणतीची ज्योत प्रकाशमान करतात. गाई-गुराच्या गोठ्यात व शेण टाकण्याच्या उकीरड्यावर पणतीची ज्योत प्रकाशित करण्यात येते. श्रीफळ व नैवेद्य अर्पण करून पूजा करण्यात येते. या मागील अन्वयार्थ बली प्रतिपदेला शेणापासून गौळणी या दूध-दुभत्याचे प्रतिक आहे. ज्यांच्या घरी भरपूर दूध, दही, तूप असते त्यांना गोकुळ म्हटले जाते. शेण गायीपासून मिळते. गौळणी दुग्ध व्यवसायाशी संबंधीत आहेत. या दोन्ही गोष्टी गोधनावर आधारीत समृद्धीचे प्रतिक आहेत.

सुपीकता आणि निर्मिती

‘शेण’ हे अत्यंत पवित्र आणि सुपीकतेचे प्रतिक मानले जाते. ते जमिनीला खत म्हणून सुपीक करते. याच पवित्र शेणातून गौळणीचे प्रतिक तयार करणे हे निर्मितीच्या शक्तीची पूजा करण्यासारखे आहे. या गौळणींना धान्याच्या लोंबा व ऊस वाहिला जातो. जी या सुपीक जमिनीतून निर्माण झाली आहेत.

कृष्ण आणि गोकुळाचे स्मरण

गौळणीचा थेट संबंध भगवान श्रीकृष्ण, गोकुळाशी आहे. कृष्ण हा गोपाळ-गायींचे पालन करणारा होता. हे संपूर्ण चित्रण म्हणजे आनंदाचे, उत्साहाचे व भरभराटीचे गोकुळ आहे. ‘बळीचे राज्य’ हे देखील अशाच एका आदर्श, सुखी राज्याचे प्रतिक आहे. यातील शेणाने तयार करण्यात आलेल्या गौळणी या शेती, पशुपालनावरती आधारीत आहेत. या प्रथा आपल्या समृद्ध जीवन शिकवितात. मग ती केरसुणी, पशुधन, उकिरडा, शेणखत या प्रत्येकाचा सन्मान आहे. प्रत्येकाविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे ‘इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे... ही केवळ दिवाळीपुरती मर्यादित इच्छा न राहता ती एका शाश्वत, समृद्ध आणि न्याय समाजाची ग्रामीण माणसाची स्वप्नपूर्ती आहे.

Advertisement
Tags :

.