आली दिवाळी... आले दीपपर्व!
दिवाळी उत्सव 19 पासून : बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या
पणजी : दिव्यांचा उत्सव तसेच सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी उत्सवाला येत्या रविवार 19 रोजी गोव्यात प्रारंभ होत आहे. या उत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा ग्राहकांनी भरून गेल्या आहेत. ठिकठिकाणी रंगीबेरंगी आकाशकंदील, विविध कलाकुसरीने सजलेल्या पणत्या तसेच दिवाळी उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री जोरात सुरू आहे. त्याचबरोबर रात्रीचे जागरण करून नरकासुराच्या प्रतिमा बनविण्याचे कामही जोरात सुरू आहे. राज्यात दिवाळी उत्सव 20 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असला तरी त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 19 रोजी गोव्यात सर्वत्र नरकचतुर्दशी साजरी करण्यात येईल. पहाटे नरकारसूर दहनाचा पारंपरिक कार्यक्रम होईल.
विविध ठिकाणी नरकासुर स्पर्धा तसेच आकाशकंदील स्पर्धांच्या स्पर्धांसह अन्य विविध प्रकारच्या स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. पेडणे, कळंगुट, म्हापसा, डिचोली, फोंडा, मडगाव, केपे, सांगे, वास्को व पणजीमध्ये अनेक ठिकाणी रात्री नरकासुर स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. नरकासुरच्या प्रतिमा बनविण्याचे काम सध्या रात्री उशिरापर्यंत गोव्यातील विविध भागात चालू आहे. त्यासाठी युवावर्ग रात्रीपर्यंत जागरण करीत असतो. गोव्याच्या दिवाळीचे वैशिष्ट्या म्हणजे नरकासुर प्रतिमा करून नरकचतुर्दशीच्या पहाटे त्याचे दहन करणे. त्यानंतर सर्वत्र दिवे प्रज्वलित केले जातात. घरे पणत्या तसेच आकाशकंदीलांनी झगमगून जातात. नरकारसुर दहनानंतर उटणे लावून अभ्यंगस्नान हा एक पारंपरिक जणू सोहळाच असतो.
चार दिवस चालणार दिवाळी
गोव्यात दिवाळीचा उत्सव चार दिवस चालतो. यंदा सोमवारी दिवाळी असली असून मंगळवारी लक्ष्मीपूजन सोहळा होईल. बरीच वर्षे दिवाळी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी होत असे, यंदा यंदा मात्र दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होईल. सध्या बाजारात लक्ष्मीपूजनासाठी विविध प्रकारचे हार तसेच सजावटीसाठी लागणारे आवश्यक साहित्य देखील बाजारात उपलब्ध झाले आहे. गोव्यातील अनेक बाजारपेठांमध्ये सध्या दिवाळीच्या तयारीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता ग्राहकांनी एकच गर्दी केलेली आहे.
जिल्हाधिकारी अद्याप शांतच
गेल्यावर्षी दिवाळी उत्सवाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण राज्यभर अनेक नरकासुर पथकांनी गोंधळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी दक्षिण व उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणत्याही सूचना नरकासुर पथकाने दिलेल्या नाहीत. त्याचबरोबर रात्री बारानंतर ध्वनि यंत्रणेचा वापर करण्याच्या विरोधात जी आवश्यक पावले उचलली पाहिजेत त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही आदेश जारी केले नाहीत. त्यामुळे यंदा देखील बराच गोंगाट सहन करावा लागेल की काय असे वाटते.
पाच दिवसांवर ठेपली दिवाळी
गेल्यावर्षी संपूर्ण गोव्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले. यावर्षी देखील उल्लंघन होऊ नये यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, दोन्ही जिह्यातील पोलिस अधीक्षक इत्यादींनी एकत्रित येऊन काही ठोस उपाय योजना आखणे आवश्यक आहे, परंतु दिवाळीला आता पाच दिवस शिल्लक असून देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही मार्गदर्शक तत्वे जारी केलेली नाहीत.