For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांना दिवाळी भेट

06:55 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांना दिवाळी भेट
Advertisement

महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ : मागील तीन महिन्यांची थकबाकी मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सणासुदीच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) वाढवला. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. एकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 टक्के डीए वाढीचे गिफ्ट देतानाच दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांनाही दिवाळीची मोठी भेट दिली. केंद्राने रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. यामध्ये गहू पिकाच्या भावात 150 रुपये प्रतिक्विंटल तर मोहरी पिकाच्या दरात 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केल्याने एकूण महाभाई भत्ता आता 53 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला. सुमारे 49.18 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 64.89 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे एकंदर 10,000 रुपयांच्या मूळ पगारावर 330 रुपयांचा फायदा होणार असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर 6 महिन्यांनी वाढतो. आता जाहीर झालेला वाढीव भत्ता 1 जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. महागाई भत्ता म्हणजे वाढती महागाई असूनही सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान राखण्यासाठी दिलेला पैसा असतो. हे पैसे सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी उपलब्ध आहेत. देशाच्या सध्याच्या महागाईनुसार संबंधित वेतनश्रेणीवर आधारित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार त्याची गणना केली जाते. शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वेगळा असू शकतो.

यापूर्वी मार्चमध्ये वाढ

साधारणत: केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा करते. यापूर्वी 24 मार्च 2024 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढीची भेट देण्यात आली होती. या वाढीमुळे त्यांना मिळणारा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला होता.

गहू-मोहरीसह सहा पिकांवर एमएसपी वाढवण्याचा निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला असून ही शेतकऱ्यांसाठी दिवाळीची मोठी भेट आहे. केंद्र सरकारने बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली. मोहरी आणि करडई तेलबियांमध्ये सर्वाधिक 300 ऊपयांनी वाढ झाली आहे. गव्हाच्या भावात क्विंटलमागे दीडशे ऊपयांनी वाढ केली आहे. बार्ली (सातू), हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

अहवालानुसार, सरकारने विपणन हंगाम 2025-26 साठी रब्बी पिकांसाठी नवीन किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. याअंतर्गत, गव्हाचा एमएसपी 150 रुपये प्रतिक्विंटलने वाढवून 2,425 रुपये करण्यात आला आहे. हा दर आतापर्यंत 2,275 रुपये प्रतिक्विंटल होता. मोहरीवरील एमएसपी 300 रुपये प्रतिक्विंटलने वाढवून 5,650 रुपये प्रतिक्विंटल वरून 5,950 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 210 रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा नवीन एमएसपी 5,650 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. हा दर पूर्वी 5440 रुपये प्रतिक्विंटल होता. याशिवाय, मसूरवरील एमएसपी प्रतिक्विंटल 275 रुपयांनी वाढवून 6,425 वरून 6,700 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. करडईच्या किमतीत 140 रुपयांनी वाढ होऊन 5,800 रुपयांवरून 5,940 रुपये झाले आहेत.

रब्बी पिकांची पेरणी मान्सूनच्या माघारीच्या वेळी (ऑक्टोबर-नोव्हेंबर) केली जाते. ही पिके साधारणपणे एप्रिलमध्ये उन्हाळी हंगामात घेतली जातात. या पिकांना पावसाचा फारसा फटका बसत नाही. भारतात गहू, हरभरा, वाटाणा, मोहरी आणि बार्ली ही प्रमुख रब्बी पिके आहेत.

पिकांवरील सुधारित एमएसपी  (प्रतिक्विंटल)

  • पीक    नवीन दर        जुने दर           फरक
  • गहू       2,425           2,275             150
  • बार्ली      1,980       1,850              130
  • हरभर    5,650        5,440              210
  • मसूर     6,700        6,425              275
  • मोहरी     5,950        5,650            300
  • करडई     5,940        5,800          140
Advertisement
Tags :

.