ट्रकच्या धडकेत रिक्षातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू
बिहारमधील दुर्घटना : संतप्त लोकांचा रास्तारोको
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणा शहराबाहेर शुक्रवारी एका भरधाव ट्रकने शाळेतून परतणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. बिहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिशुनपुरा येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या या अपघातात रिक्षात बसलेली शाळकरी मुले गंभीर जखमी झाली असून त्यातील 4 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर जमावाने संतप्त होऊन रास्तारोको केला. संतप्त जमावाने अपघात घडवणाऱ्या ट्रकच्या चालकाला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
पाटण शहरानजिकच्या विशंबपूर गावातील सनसाईज शाळेतील मुले ऑटोरिक्षाने घरी परतत होती. इयत्ता 2 ते इयत्ता 5 वी पर्यंतची एकूण 12 मुले ऑटोरिक्षातून प्रवास करत होती. ऑटो विशंबपूर गावाबाहेरील मुख्य महामार्गावर येताच समोरून एक ट्रक भरधाव वेगात येत होता. रिक्षाचालकाने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ट्रकने ऑटोला समोरून धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक बसताच मोठा आवाज झाला. या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला असून चार मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 मुले आणि ऑटोचालक गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी जखमींना तातडीने उचलून ऊग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संतप्त लोकांनी चालकाला मारहाण
संतप्त लोकांनी ट्रकचालकाला जागीच पकडून मारहाण करण्यास सुऊवात केली. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांसह इतर जमावाने रास्तारोको केला. घटनेची माहिती मिळताच डीएसपी पंकज मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव शांत होत नव्हता. गर्दीतील लोकांनी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर ट्रकचीही तोडफोड करण्यास सुऊवात केल्यामुळे खळबळ उडाली. कसेबसे पोलिसांनी लोकांना शांत करून वाहतूक कोंडी मिटवली.