भारतीय महिला क्रिकेट संघाकडून दिवाळी भेट
न्यूझीलंडवर 6 गड्यांनी मात करून मालिकाविजय, सामनावीर स्मृतीचे शतक, दीप्ती मालिकावीर
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
उपकर्णधार व सामनावीर स्मृती मानधनाचे आठवे वनडे शतक, कर्णधार हरमनप्रीतचे नाबाद अर्धशतक आणि मालिकावीर दीप्ती शर्मा व प्रिया मिश्रा यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिलांचा तिसऱ्या व निर्णायक वनडे सामन्यात 6 गड्यांनी पराभव करून तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकून शौकिनांना दिवाळी भेट दिली.
5 बाद 88 अशा नाजूक स्थितीनंतर मध्यफळीतील फलंदाज ब्रूक हॅलिडेने नोंदवलेल्या 96 चेंडूतील 86 धावांच्या बळावर न्यूझीलंड महिला संघाने तिसऱ्या व निर्णायक वनडे सामन्यात सर्व बाद 232 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 44.2 षटकांत 4 बाद 236 धावा जमवित सहज विजय साकार केला. या यशस्वी पाठलागात स्मृती मानधना व हरमनप्रीत सिंग यांची कामगिरी मोलाची ठरली. यास्तिका भाटिया व जेमिमा यांचीही त्यांना चांगली साथ मिळाली. स्मृतीने 122 चेंडूत 100 धावा जमविल्या. या खेळीत तिने 10 चौकार मारले. हरमनप्रीतसमवेत तिने तिसऱ्या गड्यासाठी 117 धावांची भागीदारी केली. त्याआधी स्मृतीने यास्तिकासमवेत दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भर घातली होती. यास्तिकाने 49 चेंडूत 35 तर हरमनप्रीतने 63 चेंडूत नाबाद 59 धावा काढल्या. जेमिमाने 18 चेंडूत 22 धावा फटकावल्या. न्यूझीलंडच्या हन्नाह रोने 2, सोफी डिव्हाईन व फ्रान जोनास यांनी एकेक बळी टिपला.
भारताचा भेदक मारा
भारतीय महिला गोलंदाजांनी या सामन्यात एकत्रित शानदार प्रदर्शन करीत शिस्तबद्ध व अचूक माऱ्यावर न्यूझीलंडला अडचणीत आणले. अलीकडेच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला लवकर बाहेर पडावे लागले होते. त्याची थोडीफार भरपाई करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. आठव्या षटकातच त्यांनी न्यूझीलंडची स्थिती 2 बाद 25 अशी केली. जेमिमा रॉड्रिग्स व यष्टिरक्षक यास्तिका भाटिया यांनी सुझी बेट्सला धावचीत केले तर लॉरेन डाऊनला सायमा ठाकुरने भाटियाकरवीच झेलबाद केले.
अकराव्या षटकात गोलंदाजीस आलेल्या लेगस्पिनर प्रिया मिश्राने भारताला मोठे यश मिळवून देताना कर्णधार सोफी डिव्हाईनला 9 धावांवर त्रिफळाचीत केले. यावेळी त्यांची स्थितीत 3 बाद 36 अशी झाली होती. चांगली धावसंख्या गाठून देण्याची जबाबदारी जॉर्जिया प्लिमरवर येऊन पडली होती. तिने परिस्थितीनुसार मोठी खेळी करण्याच्या इराद्याने अँकरची भूमिका घेतली. तिने 39 धावा जमविल्या असताना प्रिया मिश्राने तिचा प्रतिकार मोडून काढताना तिला दीप्ती शर्माकरवी झेलबाद केले. 67 चेंडूत तिने 9 धावा जमविताना 6 चौकार मारले. नंतर मॅडी ग्रीन 19 चेंडूत 15 धावा काढून धावचीत झाल्यानंतर न्यूझीलंडची 24 व्या षटकात 5 बाद 88 अशी झाली होती. हॅलिडे व यष्टिरक्षक इसाबेल गेझने डाव सावरणारी भागीदारी करताना सहाव्या गड्यासाठी 64 धावांची भर घातली. गेझला दीप्ती शर्माने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. तिने 49 चेंडूत 25 धावा केल्या. दीप्तीने नंतर हन्नाह रो हिला 11 धावांवर पायचीत केले तर ली ताहुहूने फटकेबाजी करीत 14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह नाबाद 24 धावा फटकावल्या. कार्सनला रेणुका सिंगने 2 धावांवर बाद केले तर फ्रान जोनस धावचीत झाल्यावर 49.5 षटकांत त्यांचा डाव 232 धावांत आटोपला. दीप्ती शर्माने 39 धावांत 3 तर प्रिया मिश्राने 41 धावांत 2 बळी मिळविले. रेणुका व सायमा ठाकुर यांनी एकेक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड महिला 49.5 षटकांत सर्व बाद 232 : हॅलिडे 86 (96 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), प्लिमर 39 (67 चेंडूत 6 चौकार), गेझ 25 (49 चेंडूत 1 चौकार), ताहुहू नाबाद 24 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मॅडी ग्रीन 15 (19 चेंडूत 2 चौकार), अवांतर 14. दीप्ती शर्मा 3-39, प्रिया मिश्रा 2-41, सायमा ठाकुर 1-44, रेणुका सिंग 1-49.
भारतीय महिला 44.2 षटकांत 4 बाद 236 : स्मृती मानधना 100 (122 चेंडूत 10 चौकार), शेफाली वर्मा 11 चेंडूत 12, यास्तिका भाटिया 35 (49 चेंडूत 4 चौकार), हरमनप्रीत नाबाद 59 (63 चेंडूत 6 चौकार), जेमिमा रॉड्रिग्स 22 (18 चेंडूत 4 चौकार), हसबनीस नाबाद 0, अवांतर 8. हन्नाह रो 2-45, डिव्हाईन 1-44, फ्रान जोनास 1-50.