कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालुक्यात दिवाळी सणाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात

11:05 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गावागावांमधील मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम : विविध मंडळांकडून स्पर्धांसह मनोरंजन कार्यक्रम : शेतकऱ्यांकडून भातपिकाचे पूजन

Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

तालुक्यात दिवाळी सणाला मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात हा मंगलमय सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. शुक्रवारी वसुबारस पूजनापासून या दिवाळी सणाच्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. सोमवारी तालुक्यात अभ्यंगस्नान झाले. बहुतांशी गावात सामूहिक पद्धतीने आरती करण्यात आली. गावागावातील विविध मंदिरांमध्ये सोमवारी दिवाळी सणानिमित्त विशेष पूजा करण्यात आल्या होत्या. महाआरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवाळीनिमित्त गावकरी आपल्या जागृत ग्रामदैवत व कुलदैवतांचे मनोभावे पूजन करून दर्शन घेताना दिसत होते. मंदिरामध्ये दिवसभर भजन, सायंकाळी हरिपाठ, प्रवचन, कीर्तन निरुपण व जागर भजन असे कार्यक्रम झाले.

काही गावांमध्ये सोमवारी सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी सामूहिक आरती करण्यात आली. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुख आणि दु:ख असे दोन्ही प्रसंग येतात. त्यामुळे दिवाळीच्या सणातही गोड पदार्थांबरोबरच सामूहिक आरती करताना कारटे फोडून ते खाल्ले जाते. ही परंपरा जपण्यात आली आहे. कारण कारटे खाल्यामुळे आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते, अशी प्रथा आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेला कामगारवर्गही दिवाळी सणानिमित्त आपल्या गावात आला आहे. चार-पाच दिवस आपल्या कुटुंबीयांबरोबर गावकरी, सवंगड्यांबरोबर राहून या सणाचा आनंद घेताना दिसत आहे. दिवाळी सणानिमित्त बहुतांशी गावातील सार्वजनिक युवक मंडळांच्या वतीने विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सोमवारी सकाळी नरकचतुर्दशी निमित्त शेतकरी आपल्या शिवारात जावून पूजा करीत होते. दिवाळी सणाच्या तोंडावर भातपिके बहरुन आलेली असून भाताच्या पिकांना लोंबे आलेली असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जावून पांडव पूजा केली. त्यानंतर भाताची लोंबे आणून देव्हाऱ्यासमोर ठेवून पूजा करताना दिसत होते. तसेच गावातील देवदेवतांच्या मंदिरांमध्येही भात लोंबे ठेवून पूजा करण्यात आली. बहुतांशी प्रमाणात दिवाळीत ही पूजा करुनच भातकापणीला सुरुवात करण्यात येते. यंदा अजूनही 10 ते 15 दिवसानंतर भातकापणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. देशी गायी व वासरु आहेत. त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी ग्रामस्थ जमलेले होते.

सोमवारी सकाळी काजुळ्याचे झाड आणून त्याला नैवैद्य दाखवून पूजा करण्यात आली. दिवाळी सणानिमित्त सोमवारी सायंकाळी बहुतांशी मंदिरामध्ये दीपोत्सव कार्यक्रम करण्यात आले. तसेच मंगळवारी व बुधवारीही काही मंदिरांमध्ये दीपोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील गावागावांमध्ये चौकात, गावच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहेत. या शिवस्मारकाजवळ शिवप्रेमी दीपोत्सव करताना दिसत आहेत. दिवाळी सणानिमित्त ग्रामीण भागातील मच्छे, पिरनवाडी, बेळगुंदी, हलगा आदी भागातील विविध दुकानांमध्ये  खरेदीसाठी गर्दी झाली होती. तालुक्यातील नागरिक बेळगावला येवून दुचाकी, चारचाकी, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article