For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळी, दिवाळे, दिवाळखोरी

06:50 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
दिवाळी  दिवाळे  दिवाळखोरी
Advertisement

उत्तरेत महाराष्ट्रासारखे नाही. दिल्लीकडे दिवाळी केवळ एक दिवसाची असते. ज्या दिवशी लक्ष्मी पूजन असते ती दिवाळी. त्याच्या आगेपीछे जवळ जवळ काहीच नाही. ना नरकचतुर्दशी म्हणून लवकर उठणे, ना उटणे लावून आंघोळ करणे. वसुबारस नाही. भैय्या दुज म्हणजे भाऊबीज आहे पण पाडवा नाही. दिवाळी म्हणजे धूमधडाक्याने साजरी करतात. पण पुण्या-मुंबईची दिवाळीची मजा इथे नाही. घरी बनवलेले फराळाचे पदार्थ नाहीत. महाराष्ट्रात शाळांना दिवाळीच्या मोठ्या सुट्ट्या पण इकडे केवळ दोन-चार दिवसच. उत्तरेत दिवाळी म्हणजे मोठा सण. पण परिवाराने फारसे एकत्र येणे नाही, उठणे बसणे नाही. दिवाळीत लक्ष्मी पूजा जरूर आहे.

Advertisement

इकडे काही ठिकाणी त्या दिवशी पत्ते खेळायची परंपरा आहे. पैसे लावून पत्ते खेळले जातात. अगदी साग्रसंगीत खेळले जातात. लक्ष्मीच्या आगमनानंतर प्रत्येक जण आपले नशीब अजमावू बघतो. दुसरे काय केले जाते तर सर्रास मदिरापान. एक प्रकारे ती अशा लोकांना पर्वणीच. या वर्षी केवळ राजधानी दिल्लीत 550 कोटी रुपयांची दारूची विक्रमी विक्री दिवाळीच्या एक आठवडापूर्वी झाली यावरून हा शौक किती मोठ्या प्रमाणावर पाळला जात आहे ते लक्षात येते. दिवाळीच्या वेळी ज्या भेटी दिल्या जातात त्यात मिठाई, सुकामेवा तर असतोच पण उच्चभ्रू वर्गात उंची मद्याच्या बाटल्यादेखील असतात.

दिल्ली नेहमी बदलती राहिली असली आणि कोणा एकाची राहिली नसली तरी सध्याच्या राजधानीवर एक पंजाबी छाप आहे. चिकन आणि पौवा त्याची निशाणी आहे. दिल्लीतील धार्मिकता इथे असणारा बनिया वर्गाचा देखील प्रभाव दाखवते.

Advertisement

दिल्लीच्या काही उपनगरांवर चाकरमान्यांचा प्रभाव आहे. ते संपूर्ण देशातून आलेले आहेत. पश्चिम दिल्लीत पंजाबी वर्गाचा भरणा आणि तेथील संस्कृती वेगळी. दक्षिण दिल्ली सर्वात पॉश मानली जाते. असे म्हणतात की येथील कुटुंबे आपल्या मुलीदेखील याच भागात देतात. इतर भाग ते बरच गौण मानतात. दुसरीकडचा जावई देखील नको आणि मुलगी देखील नको. जुनी दिल्ली अगदी वेगळी. ती लाल किल्ल्याच्या भोवताली पसरलेली. किल्ल्यासमोरच भव्य अशी जामा मस्जिद आणि तिला लागून चांदणी चौक, त्याच्या असंख्य गल्ल्या आणि भाग. या भागात पूर्णपणे मुस्लिम प्रभाव. कुठेकुठे इतिहास थबकला वाटतो. इथे असणाऱ्या एका जीर्णशीर्ण मशिदीजवळ उभे राहून 400-500 वर्षांपूर्वी तैमूर लंगाने दिल्लीकरांच्या शिरकाणाचा आदेश दिला होता असे म्हणतात. ही कत्तल एक आठवडा चालली होती. याच्या जवळपास असलेला एक भाग म्हणजे ‘बडा हिंदुराव’ इथे मराठ्यांचा रेसिडेंट असलेला सरदार हिंदुराव जाधव याचा वाडा होता. त्याचा अपभ्रंश होऊन ‘बडा हिंदुराव’ झाले. मराठ्यांच्या सल्ल्याने तेव्हा बादशहा चालायचा म्हणून हिंदुराव हे एक मोठे प्रस्थ होते. आता बडा हिंदुराव एका हॉस्पिटलमुळे दिल्लीभर परिचित आहे.

यंदाची दिवाळी दिल्ली करता फारशी चांगली गेली नाही. कारण एकेकाळी गुलाबी थंडीची मजा चाखण्यासाठी इथे लोक बाहेरून यायचे. आता पंजाबमध्ये शेतकरी शेतातील तण जाळतात. त्याने दिल्लीत प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जगातील अतिशय प्रदूषित शहरात दिल्लीचे रूपांतर या दिवसात झाल्याने श्वास घेणे म्हणजे एक कष्टाचे काम. राजधानीत एवढे भयानक स्मॉग निर्माण झाल्याने बाहेरचा माणूस आला तर आजारीच पडणार हे नक्की. गेल्या आठ-दहा वर्षात ही समस्या वाढलेली असली तरी केंद्र सरकार असो अथवा स्थानिक दिल्ली सरकार वा पंजाब सरकार यांनी एकमेकांवर दोषारोपण करण्याशिवाय फारसे काहीही केलेले नाही. ज्या शहरात देशाचे सरकार आहे त्याची अशी रया कधी झाली नव्हती. शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना प्रदूषणाचा मुद्दा जेव्हा पुढे आला तेव्हा बसेस सीएनजीवर करून हा प्रश्न सोडवण्यात आला होता. या प्रदूषणामुळे दिल्लीच्या शाळांना एक मोठी सुट्टी जाहीर झालेली आहे. प्रदूषण आहे तसेच आहे पण नेतेमंडळी मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत अथवा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे प्रचारात  दंग आहेत.

दम्यासारखा त्रास असलेल्या सोनिया गांधी या जयपूरला जाऊन राहिलेल्या आहेत तर राहुल गांधी तिकडूनच प्रचाराला जात आहेत. बादशहाची दिल्ली बकाल होत आहे. ‘दिल्ली स्मॉग’ मुळे दम घुटत आहे. त्यातच राजकीय ताणतणाव जबर वाढत आहेत. ‘दिल्ली शराब घोटाळा’ गाजत आहे. केजरीवाल सरकारने काही दारू उत्पादकांना अबकारी करात भारी फेरबदलाव करून अब्जावधी रुपये खाल्ले असा आरोप केंद्राने करून माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंग यांना तुरुंगात टाकले.

आता कोणत्याही क्षणी केजरीवाल यांना आत टाकणार असे वातावरण बनवले गेलेले आहे. ईडीने त्यांना तपासणीकरता बोलावले आहे तर केजरीवाल यांनी तुरुंगातून कारभार करावा अथवा कोणाला मुख्यमंत्री नेमावे याबाबत लोकांचा सल्ला घेतला जाणार आहे असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या विधानसभेत 70 जागा आहेत त्यापैकी 62 जागा केजरीवाल यांच्या पक्षाने जिंकल्या आहेत. केवळ 8 जागा भाजपला मिळाल्या आहेत. काँग्रेसचा गेली दहा वर्षे विधानसभेत भोपळा आहे. केजरीवाल तुरुंगात गेले तर आम आदमी पक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असे भाजपचे अनुमान आहे.

भाजपमधील एक गट मात्र केजरीवाल यांना तुरुंगात घालाल तर त्यांना ‘मोठे कराल’. असे झाले तर भाजप अजूनच गाळात जाईल असा दावा करत आहेत. पण त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत श्रेष्ठी नाहीत. या लट्ठालट्टीत काँग्रेस राजधानीत वाढू लागली आहे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हा न्याय काहीअंशी दिसत आहे. लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर आहे तर त्यानंतर 6-7 महिन्यांवर दिल्लीची विधानसभा निवडणूक. अशात भाजपच्या हाती भोपळा सोपवण्याची मोहीम केजरीवाल यांनी सुरु केली आहे.

इकडे केजरीवाल आणि महुआ मोईत्रा या विरोधकांना ठीक करण्याच्या कामाला भाजप लागली असताना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ज्या घटना घडत आहेत त्याने भारतापुढे नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत/ ठाकणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे सर्वोच्च नेते शी जीन पिंग यांची जी बैठक झाली त्याने हे अधोरेखित केलेले आहे. जगातील ही दादा मंडळी ज्या पद्धतीने कामाला लागली आहेत त्याने भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

अमेरिका आणि चीनचे गुळपीठ जमले तर भारताच्या सीमेवर चीन अजून आक्रमक होत जाईल अशी भीती आंतरराष्ट्रीय सुरक्षा वर्तुळात वाढत आहे. ती अनाठायी नाही. चीन हा अतिशय धूर्त आणि धोरणी देश आहे. एकीकडे अमेरिकेशी वाटाघाटी तर दुसरीकडे पाकिस्तानच्या आरमाराबरोबर त्याने कवायत सुरु केली आहे. मालदीवमध्ये त्याच्या धार्जिणे सरकार सत्तेत आलेले आहे तर श्रीलंकेला त्याने प्रचंड कर्ज देऊन मिंधे केलेले आहे. म्यानमारमधील सैनिकी शासनाला त्याचा जोरदार पाठिंबा आहे. तालिबानने सत्ता मिळवल्यापासून अफगाणिस्तान आणि चीनची मैत्री वाढत आहे. इराणला त्याने आपलेसे केले आहे.

भारताच्या राशीत शनी-मंगळ अशी अभद्र युती आली आहे अशी शंका येत आहे. अशा वेळी या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याचा साधक बाधक विचार झाला नाही तर ती नवी दिल्लीची दिवाळखोरी ठरेल. ‘भारत विश्वगुरू’ झालेला आहे हा प्रचार ठीक पण बदलत्या जागतिक घडामोडीत आपली मान वर ठेवायला त्याला एक खूप हुशार विद्यार्थी होण्याची गरज आहे. या दिवाळीची हीच शिकवण आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.