राज्यात दिवाळी उत्सवाला उद्या प्रारंभ
बाजारपेठांमध्ये गर्दी, रस्त्यांवर वाहतूक कोडी
पणजी : राज्यात दिवाळी उत्सवाला खऱ्या अर्थाने उद्या शनिवारी 11 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत आहे. दिवाळीच्या तयारीमध्ये सर्व नागरिक गुंतले असून बाजारात गर्दी झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे. आजही मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी बाजारात जातील. दिवाळीचे गोव्यातील वैशिष्ट्या म्हणजे नरकासुर प्रतिमा दहन हा कार्यक्रम रविवारी पहाटे होईल. दिवाळीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण गोव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीचे खास वैशिष्ट्या म्हणजे नरकासुर प्रतिमा. सध्या गावोगावी प्रतिमा उभारण्यात युवावर्ग दंग झालेला आहे. रात्री उशिरापर्यंत प्रतिमा तयार करण्यात ही माणसे गर्क झालेली दिसतात.
दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे पोहे, मिठाई, चुरमुरे, सुकामेवा तसेच रंगीबेरंगी आकाशकंदील उपलब्ध झाले आहेत. विद्युत रोषणाईसाठी दिव्यांच्या माळा, विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या, विविध प्रकारचे दिवे तसेच लक्ष्मीपूजनसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि भाऊबीजेसाठी बहिणीला देण्यात यावयाच्या विविध प्रकारच्या साड्या, कपडे आणि भेटवस्तू खरेदीसाठी सर्व बाजारपेठांमध्ये एकच गर्दी उसळलेली दिसून येत आहे. राजधानी पणजीमध्ये आकाशकंदील व तत्सम आकर्षक दिव्यांनी बाजार भरलेला आहे. ग्राहकांची सर्व दुकानांवर गर्दी उसळलेली दिसून येत आहे. त्यामुळे काल गुऊवारी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. आज व उद्या दोन्ही दिवस वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली दिसून येईल. दरम्यान आज धनत्रयोदशीनिमित्त अनेक आयुर्वेदिक वैद्य धन्वंतरीची पूजा करतील. तसेच दिवाळीच्या उत्सवाचा एक भाग म्हणून आज मोठ्या प्रमाणात सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी होण्याची शक्यता आहे.