खानापूर शहरासह तालुक्यात दीपावली उत्साहात साजरी
संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण : खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी : आज लक्ष्मी पूजेची जय्यत तयारी
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी पहाटे घरोघरी अभ्यंगस्नान व औक्षण करण्यात आले. तर ग्रामीण भागात एकत्र आरती करण्याची परंपरा आजही कायम आहे. सोमवारी पहाटे ग्रामीण भागात गल्लीत एकत्र आरती करण्यात आली. दीपावली सणामुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोमवारीही खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती.
पुढील तीन दिवस दीपावली सण साजरा करण्यात येणार आहे. यात आज मंगळवारी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त असल्याने व्यापाऱ्यांनी पुजेची तयारी सुरू केली आहे. बुधवार दि. 22 रोजी बलिप्रतिपदा (पाडवा) साजरा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात अद्याप आजही अंगणात शेणाचे पाडवे करण्याची परंपरा कायम आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात ही परंपरा जपली जाते. खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात दीपावलीनिमित्त बालचमूंकडून तसेच युवकांकडून ऐतिहासिक किल्ले बनवले गेले आहेत. गुरुवार दि. 23 रोजी भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा जपणारा भाऊबीज हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मांसाहार करण्याची परंपरा आहे.
पाडव्यानिमित्त म्हशींची मिरवणूक
बुधवार दि. 22 रोजी बलिप्रतिपदा (पाडवा) असल्याने या दिवशी गो पालक आपल्या म्हशींची सवाद्य मिरवणूक काढणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने निंगापूर गल्लीतील शेतकरी निलेश सडेकर, विनायक सडेकर, रजद सडेकर, आनंद सडेकर यांनी ही प्रथा गेल्या काहीवर्षापासून सुरू केली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे असलेल्या गवळट जातीच्या म्हशीची धनगरी वाद्य नृत्यासह घोडे गल्ली, स्टेशनरोड, महामार्ग, निंगापूर गल्ली आदी परिसरात मिरवणूक काढतात.