जांबोटी भागात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी
वार्ताहर/जांबोटी
जांबोटी भागात अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या भागात हा सण आबालवृद्धांकडून पारंपरिकरित्या मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला आहे. सोमवार दि. 20 रोजी नरकचतुर्दशी निमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने आपल्या घराच्या दारात सुवासिनींकडून परंपरेप्रमाणे मंगलारतीची ओवाळणी करून तसेच परंपरेप्रमाणे कारीट फोडून कडू खाऊन दिवाळी सण साजरा केला. तसेच दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या दारात सुबक, नक्षीदार रांगोळ्dया रेखाटून तसेच घरोघरी दिव्यांची आरास करून, मंगलमय वातावरणात हा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त अनेक नागरिकांनी आपल्या घरावर विद्युत रोषणाई तसेच आकाश कंदील लावले आहेत. तसेच घरोघरी दिव्यांचा झगमगाट पहायला मिळत आहे. तसेच अनेकांनी नवीन कपडे परिधान करून तसेच मिठाई वाटप करून दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा केला. दिवाळीनंतर सुगीच्या कामाला प्रारंभ होणार असल्यामुळे शेतकरी वर्गदेखील सुखावला आहे. तसेच परगावी असलेले चाकरमानीदेखील कुटुंबासह गावाकडे दाखल झाले असून विविध प्रकारच्या फराळांमुळे सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे.