वसुबारसने दिवाळी पर्वाची सुरुवात
वासरासह गायीची भक्तीभावे पूजा ; सर्वत्र उत्साहाचे वातावरण
बेळगाव : शहर परिसरात अश्विन कृष्ण एकादशी अर्थात रमा एकादशी व दुपारनंतर व्दादशी ही तिथी सुरू झाल्याने गोवत्स द्वादशी साजरी करण्यात आली. गायीचे वासरासह पूजन करण्याचा हा दिवस ग्रामीण भागासह शहरातूनही साजरा होत असतो. याला वसुबारस असेही म्हटले आहे. याच दिवसापासून दिवाळी पर्वाची सुऊवात होत असते. दिवाळीचे पर्व सुरू झाले असून सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.
हिंदू धर्मात वसुबारसला मोठे महत्त्व आहे. सुवासिनी महिला कुटुंबाच्या मुख्यत्वे मुल़ांच्या कल्याणासाठी गायीची पूजा करतात. गायीमध्ये 33 कोटी देवत़ांचा वास असल्याची हिंदू धर्मियांची धारणा आहे. वसू म्हणजे गाय व बारस म्हणजे बारावा दिवस. गायीचे पूजन करून तिला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो. आजकाल शहरी भागात गाय दिसून येत नाहीत. त्यामुळे गायीची वासरासह असलेल्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा करण्याची पद्धत रुढ होऊ लागली आहे.
तथापि, गवळीवाड्यांमध्ये, गो-शाळांमध्ये व ज्यांच्याकडे पशुधन आहे अशा लोकांनी अत्यंत श्रद्धेने आपापल्या पशुधनाची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली. त्यातून कामधेनूचीही (गाय) उत्पत्ती झाली. त्यामुळेच हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गायीची सेवा केल्याने कुट़ुंबात सुख-समृद्धी नांदते. गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्याने सर्व देवतांच्या पूजेचे फळ मिळते, अशीही धारणा आहे.