For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात दीपावलीला उत्साहाने सुरुवात

11:15 AM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात दीपावलीला उत्साहाने सुरुवात
Advertisement

तालुक्यात प्रकाशपर्वाला सुरुवात : सगळीकडे चैतन्याचे-आनंदाचे वातावरण : विद्युतरोषणाईमुळे सर्वत्र प्रकाशमय

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात रविवारपासून प्रकाशपर्वाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण पसरले असून शहरासह ग्रामीण भागात दिवाळीची धामधूम सुरू असून बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तसेच बालचमू किल्ला बनवण्यात गर्क झाले आहे. तर घराघरातून फराळाचा सुवास दरवळत आहे. त्यामुळे वातावरण पूर्णपणे उत्सवमय झाले आहे. शहरात दीपावलीच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लागले असून यात रांगोळी, आकाश कंदील, किल्ल्याचे मावळे, उटणे, साबण, सुवासिक तेल याची खरेदी होताना दिसून येत आहे.

सोमवार दि. 20 रोजी नरक चतुदर्शी असल्याने पहाटे अभ्यंगस्नान आणि औक्षण करण्यात येणार आहे. तर मंगळवार दि. 21 रोजी आमावस्या असल्याने व्यापारी वर्ग आणि घरगुती लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. तर बुधवार दि. 22 बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) साजरा करण्यात येणार आहे. तसेच गुरुवार दि. 23 भाऊबीज असल्याने भावा बहिणीतील अतुट नात्याची ओवाळणी घरोघरी होणार आहे. यावर्षी दीपावलीचा पर्व सलग चार दिवस असल्याने सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे.

Advertisement

विविध साहित्यांचे स्टॉल्स सजले

शहरात दीपावलीच्या साहित्याने दुकाने सजली असून मोठमोठे स्टॉलही लावण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील, विद्युतरोषणाईचे साहित्य, विविध नमुन्याचे आणि आकारच्या रंगीबेरंगी पणत्या, अनेक रंगाच्या रांगोळ्याचे साचे, सुंगधीत उटणे, साबण, तेल यासह इतर साहित्याने दुकाने सजली आहेत. दीपावलीच्या साहित्याची खरेदी मोठ्याप्रमाणात होत आहे. तसेच कापड दुकानातही खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. तर किराणा दुकानातही दीपावलीच्या साहित्यासाठी गर्दी होत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. खानापूर शहरातील स्टेशनरोड, बाजारपेठ तसेच इतर भागातील दुकानावर लक्ष्मी पूजनानिमित्त विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. खानापूर शहरातील विठ्ठल मंदिरात अश्विन प्रतिपदेपासून काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. दीपावलीचे औचित्य साधून विठ्ठल मंदिरातील काकड आरतीलाही बरीच गर्दी होत आहे.

किल्ले बनवण्याची लगबग

खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात दीपावलीच्या काळात इतिहासकालीन किल्ले बनवण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरात तसेच ग्रामीण भागातही बालचमूनी तसेच युवकांनी ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे किल्ले सर्वांसाठी सोमवारपासून खुले करण्यात येणार आहेत. हवामानातील बदल झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले असून ग्रामीण भागात गावोगावी बैलगाडी शर्यत, क्रिकेट, कबड्डी, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरण बनले आहे.

कडक ऊन-थंडीचा परिणाम

गेल्या चार दिवसांपासून हवामानात एकदम बदल झाला आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी मोठ्याप्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. मात्र गेल्या चार दिवसापासून हवामानात पूर्णपणे बदल झाला असून दिवसभर कडक ऊन पडत असून सकाळी आणि सायंकाळी थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. पावसाने उघडीप दिल्याने भात कापणीसाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने भातपिके चांगली आहेत.

Advertisement
Tags :

.