अमेरिकेच्या अध्यक्षांकडून व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी
सुनीता विलियम्स यांनी अंतराळातून दिल्या शुभेच्छा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सोमवारी रात्री व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली आहे. यानिमित्त आयोजित सोहळ्यात 600 हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक सामील झाले. व्हाइट हाउसमध्ये आतापर्यंतच्या सवांत मोठ्या दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे उद्गार बिडेन यांनी यावेळी भारतीय-अमेरिकन खासदार, अधिकारी आणि उद्योजकांना संबोधित करताना काढले आहेत.
अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सिनेटर असताना मोठ्या संख्येत भारतीय-अमेरिकन लोकांसोबत काम केले आहे. दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाने अमेरिकन जीवनाच्या प्रत्येक हिस्स्याला समृद्ध केले आहे. हा जगात सर्वात वेगाने वाढणारा समुदाय आहे. आता दिवाळी व्हाइट हाउसमध्ये गर्वाने साजरी केली जात असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
बिडेन यांच्याकडून हॅरिस यांचे कौतुक
यावेळच्या दिवाळीनिमित्त आयोजित सोहळ्यात उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बिडेन सामील होऊ शकल्या नाहीत. जिल आणि कमला यांना यात सहभागी व्हायचे होते, परंतु त्या प्रचारमोहिमेत व्यग्र असल्याचे बिडेन यांनी सांगितले आहे. अनेक कारणांमुळे मी कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले आहे. कमला हॅरिस यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकताहे. त्यांच्याकडे अन्य व्यक्तीच्या तुलनेत अधिक अनुभव आहे असे म्हणत बिडेन यांनी कमला हॅरिस यांचे यावेळी कौतुक केले आहे.
सुनीता विलियम्स यांचा संदेश
तर अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून व्हिडिओ संदेशाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चालू वर्षी मला अंतराळ स्थानकावर पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर दिवाळी साजरी करण्याची अनोखी संधी मिळाली आहे. माझ्या वडिलांनी नेहमीच दिवाळी आणि अन्य भारतीय सणांविषयी आम्हाला शिकविले आणि स्वत:च्या सांस्कृतिक मूळाशी जोडून ठेवले. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे, कारण जगात चांगलेपणा कायम आहे असे सुनीता विलियम्स यांनी स्वत:च्या संदेशात म्हटले आहे.
व्हाइट हाउसमध्ये 2003 पासून प्रारंभ
जॉर्ज बुश हे अध्यक्ष असताना व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात झाली होती. 2003 मध्ये ही परंपरा सुरू झाली. परंतु बुश हे वैयक्तिक स्वरुपात यात कधीच सामील झाले नव्हते. 2009 साली बराक ओबामा यांनी अध्यक्ष झाल्यावर व्हाइट हाउसमध्ये वैयक्तिक स्वरुपात दिवाळी साजरी केली होती.