दिव्याचे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल : मुख्यमंत्री फडणवीस
ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार : राज्य सरकारतर्पे तीन कोटी ऊपयांचे बक्षीस
नागपूर/ प्रतिनिधी
जागतिक स्तरावर बुद्धिबळमध्ये असणारे चीनच्या वर्चस्वाला हादरे देत नागपूरच्या दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले. वयाच्या केवळ 19 व्या वर्षी तिने मिळवलेले जेतेपद हे कौतुकास्पद आहे. तिने कमी वयात मोठी उंची गाठली असून देशातल्या हजारो मुलामुलींना हे यश प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दिव्याचा शनिवारी नागपुरातील सुरेश भट सभागृहात शासनातर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 3 कोटी रुपयांच्या बक्षीसाचे धनादेश देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी आवश्यक आहे. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्यावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही 11 लाख ऊपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडून सन्मान करण्यात आला.
दिव्याचे यश कौतुकास्पद
दिव्याने कमी वयात लक्ष विचलित न होऊ देत ध्येयावर लक्ष पेंद्रीत केले. बुद्धिबळात एकाग्रता आणि सजगता आवश्यक असते. बुद्धिबळ हा खेळ शंभरावर देशात खेळला जातो. त्यामुळे दिव्याने गाठलेले यश मोठे आहे. यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिव्याने संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे. आगामी काळातही तिला संपूर्ण सहकार्य करु, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, यशस्वी खेळाडू घडताना त्यांच्यामागे असलेले कुटुंब, प्रशिक्षक आणि व्यवस्थाही तितकीच महत्वाची असते. त्यामुळे त्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. मुलींना संधी, योग्य प्रशिक्षण आणि प्रेरणा दिल्यास त्या जग जिंकू शकतात. दिव्याने हे परिवर्तन सिद्ध करून दाखविले आहे. हे यश सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यावेळी म्हणाले.
यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल, आमदार संदीप जोशी, अभिजित वंजारी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार परिणय फुके यांच्यासह नागपूरकर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राचा मला अभिमान
नागपूर हे शहर माझ्यासाठी विशेष आहे. या सत्कार कार्यक्रमासाठी नागपूरकरांचे आभार मानते. या यशानंतर पुढील जागतिक स्पर्धांसाठी आणखी जोमाने तयारी करणार आहे.
दिव्या देशमुख, बुद्धिबळपटू. 
सरन्यायाधीशांची शाबासकी
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुद्धीबळ विश्व विजेती दिव्या देशमुख हिच्या नागपूरमधील शंकरनगर येथील घरी जाऊन तिला शुभेच्छा देत शाबासकी दिली. आमचे तीन पिढ्यापासूनचे कौटुंबिक नाते आहे, दिव्याचा विजय हा कौटुंबिक आनंदाचा क्षण आहे, अशी भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.