दिव्यांग भवनला मिळाला अखेर मुहूर्त
कोल्हापूर :
दिव्यांग बांधवांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग भवन (ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल पीपल) महापालिकेच्या वतीने कोल्हापूरात उभारण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने 1 कोटी 71 लाख रुपयांची तरतूद केली होती. तब्बल 19 महिन्यानंतर या दिव्यांग भवनाच्या कामास मुहूर्त मिळाला आहे. दिव्यांग भवनाची जुनी इमारत पाडण्यासाठी महापालिकेने कोटेशन मागिवले असून, आठ दिवसांत या कामास सुरुवात होणार आहे. यामुळे दिव्यांग बांधवांच्या भवनाची स्वप्नपुर्ती लवकरच होणार आहे.
कोल्हापुर शहरामध्ये 2 हजार 700 दिव्यांग बांधव आहेत. दरवर्षी महापालिकेच्या वतीने अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांच्या विविध उपक्रमांसाठी 5 टक्के निधी राखीव ठेवला जातो. महापालिकेच्या वतीने त्यांना विविध सुविधा पुरविण्यासाठी मंगळवार पेठ येथील बेलबागेत 16 हजार चौरस फुटाच्या जागेमध्ये भव्य असे दिव्यांग उभारण्याचे नियोजन केले. यासाठी महापालिकेने 2023-24 अर्थसंकल्पामध्ये 5 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली. या निधीतून शहरातील बेलबाग, मंगळवार पेठत तीन मजली भव्य असे दिव्यांग भवन उभारण्यात येणार आहे. मार्च 2023 रोजी महापालिकेने या निधीची तरतूद केली होती. मात्र विविध कारणांमुळे हे काम रखडले होते. या कामाला 19 महिन्यानंतर अखेर मुहूर्त मिळाला आहे. या कामची वर्क ऑर्डर झाली असून, जुनी इमारत पाडण्यासाठी कोटेशन मागविण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे दिव्यांग बांधवांच्या भवनाची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
इमारतीमध्ये मिळतील या सुविधा
दिव्यांग भवनाची इमारत भव्य तीन मजील असणार आहे. इमारतीचे बांधकाम एकूण 16 हजार चौरस फूट आहे. पहिल्या मजल्यावर आवाजाच्या सहाय्याने मेडिकल ट्रीटमेंट सेंटर, फिजिओथेरपी सेंटर, कल्चरल हॉल, व्हीलचेअर रिपेअर अँड सेल शॉप, कन्सल्टिंग रूम असेल. पहिल्या दुसऱ्या मजल्यावर इनडोअर गेम, जिम, कॉन्फरन्स हॉल, ब्रेन क्रिप्ट वर्कशॉप, मेडिटेशन कौन्सिलिंग अँड लीगल सपोर्ट सेंटर तसेच तिसऱ्या मजल्यावर म्युझिक रूम, स्पीच थेरपी, सिम्युलेशन रूम, लॉज रूम असणार आहे.
महापालिकेकडून दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या सुविधा
40 ते 70 टक्के दिव्यांगांना महिना 1 हजार रु. अनुदान
70 टक्केवर दिव्यांगांना महिना 1500 रु. अनुदान
कुष्ठरुग्ण बांधवांना महिना 1500 रु. अनुदान
दिव्यांग बांधवांना विवाहासाठी 21 हजार अनुदान
मृत दिव्यांग बांधवांच्या कुटुंबीयांना 30 हजार अनुदान
दिव्यांग भवनाची वर्क ऑर्डर विधानसभा निवडणूकीपुर्वीच ठेकेदाराला देण्यात आली आहे. जुनी इमारत पाडण्यासाठी प्रस्ताव करुन त्यास मंजूरीही घेण्यात आली आहे. जुन्या इमारतीचे बांधकाम उतरविण्यासाठी 3 कोटेशन आले असून, या आठवड्यात इमारतीचे बांधकाम पाडण्यास सुरुवात होणार आहे.
सुरेश पाटील,उपशहर अभियंता