दिव्याने हम्पीला बरोबरीत रोखले
आता टायब्रेकरवर ठरेल विजेता
वृत्तसंस्था/ बटुमी, जॉर्जिया
इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुखने रविवारी आपल्याहून उच्च स्थानावर विसावलेल्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला सोप्या बरोबरीत रोखले. त्यामुळे फिडे महिला विश्वचषकाची अंतिम फेरी आता टायब्रेकरमध्ये गेली आहे, जिथे विजेता निश्चित करण्यासाठी कमी कालावधीचे सामने खेळविले जातील.
सामन्याच्या पहिल्या गेममध्ये आशादायक सलामीचा पुरेपूर वापर न केलेल्या दिव्याला काळ्या सोंगाट्यांसह खेळताना फारशी अडचण आली नाही. 34 चालींमध्ये हा सामना बरोबरीत सुटला. आता टायब्रेकरमध्ये प्रत्येक चालीनंतर 10 सेकंदांच्या वाढीव वेळेसह 15 मिनिटांचे दोन गेम खेळले जातील. जर गुण तरीही बरोबरीत राहिले, तर खेळाडू प्रत्येक चालीमागे 10 सेकंदांच्या वाढीव वेळेसह प्रत्येकी 10 मिनिटांच्या गेमचे आणखी एक संच खेळतील.
जर तरीही कोंडी सुटली नाही, तर दोन्ही खेळाडू पाच मिनिटांचे आणखी दोन गेम खेळतील. यात प्रत्येक चालीमागे तीन सेकंदांची वाढीव वेळ मिळेल. जर त्यातून निर्णायक निकाल मिळाला नाही, तर दोन्ही खेळाडूंना तीन मिनिटे देणारा एक गेम खेळविला जाईल. यात प्रत्येक चालीमागे दोन सेकंदांची वाढीव वेळ मिळेल आणि जोपर्यंत एक विजेता ठरत नाही तोपर्यंत लढत खेळविली जाईल. दरम्यान, चीनच्या झोंगयी टॅन आणि लेई टिंगजी यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठीचा प्ले-ऑफ सामनाही अनिर्णीत राहण्याच्या दिशेने आगेकूच करत होता.