दिव्या देशमुखचा सनसनाटी विजय
फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धा : ग्रँड मास्टर वैशाली रमेशबाबूला दिव्याकडून पराभवाचा धक्का
प्रतिनिधी/ पुणे
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर केवळ 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने ग्रँड मास्टर वैशाली रमेशबाबू हिच्यावर सनसनाटी विजय मिळवताना दुसऱ्या फेरीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
अमनोरा द फर्न येथे सुरु असलेल्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत दुसऱ्या पटावरील लढतीत डावाच्या सुरुवातीपासून वर्चस्व गाजवणाऱ्या वैशालीची एकाग्रता क्षणभर भंग पावली आणि तिच्या हातून झालेल्या चुकीचा पुरेपूर फायदा घेत दिव्याने एका गुणाची कमाई केली. हा सामना जेमतेम 1 तास चालला.
दिव्या आणि वैशाली यांच्यातील ही लढत रुय लोपेझ पद्धतीच्या डावपेचांनी प्रारंभ झाल्यामुळे रंगतदार ठरणार अशी पहिल्यापासूनच चिन्हे होती. वैशालीने आपला राजा मध्यावरच ठेवला होता, तर दिव्याने राजाच्या बाजूला कॅसलिंग करून आपले आक्रमक डावपेच स्पष्ट केले होते. सलामीच्या काही चाली अत्यंत वेगाने पार पडल्यानंतर दिव्याने सोळावी चाल अनपेक्षितरित्या अपारंपरिक पद्धतीने केली. त्याचा परिणाम म्हणून वैशालीच्या हातून पुढच्याच चालीला घोडचूक झाली. वैशालीने त्याची भरपाई करण्यासाठी उंटाला मध्ये घालण्याचा प्रयत्न केला. परंतु दिव्याने वजीरावजीरी करून पुढच्याच चालीत तिचा उंटही मारला. यावेळी वैशालीकडे शिल्लक राहिलेली प्यादी एकमेकाशेजारी नसल्यामुळे एकटी पडली होती. पाठोपाठ दोघींनीही एकमेकींची अनेक मोहरी मारल्यानंतर वैशालीकडे बचावाची संधीच राहिली नसल्याने तिने 26 व्या चालीला शरणागती पत्करली.
मी केलेल्या अनपेक्षित चालीच्या बाबतीत थोडीशी नशीबवान ठरले. हा सामना इतक्या लवकर संपेल अशी माझी अपेक्षा नव्हती. परंतु डाव संपण्यास पाचच मिनिटे बाकी असताना वैशालीने केलेली चूक माझ्या पथ्यावर पडली. अन्य लढतीत भारताच्या हरिका द्रोणावल्ली हिने पोलंडच्या ग्रँड मास्टर वैशाली रमेशबाबू बरोबरीत रोखले.
आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख
निकाल : दुसरी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार
दिव्या देशमुख (2 गुण, भारत) वि. वि. वैशाली रमेशबाबू (0.5 गुण,भारत);
हरिका द्रोणावल्ली (0.5 गुण, भारत) बरोबरी वि. एलिना कॅशलीनस्काया (0.5 गुण, पोलंड).