दिव्या देशमुखचे जल्लोषात स्वागत
‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते : 2 ऑगस्ट रोजी दिव्याचा भव्य सत्कार‘,पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर : बुद्धिबळ विश्वात भारताचे नाव उज्ज्वल करणारी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख बुधवारी रात्री नागपुरात परतली. यावेळी नागपूर विमानतळावर तिचे ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. फिडे महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियनचा मान पटकावून परतलेल्या दिव्याच्या स्वागतासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी (29 जुलै) जॉर्जियामधील बाटुमी येथे झालेल्या अंतिम सामन्यात दिव्याने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या यशानंतर ती आज रात्री नागपूरमध्ये परतली. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर तिच्या स्वागतासाठी नागपूरकर आणि चेस फेडरेशनने जय्यत तयारी केली होती. दिव्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी, विशेषत: बुद्धिबळ खेळणारी शाळकरी मुले आणि लहान मुली जमल्या होत्या. दिव्याच्या स्वागतासाठी तिचे वडील आणि आजी देखील उपस्थित होते. दिव्या विमानतळावर पोहोचताच सारा परिसर जल्लोषमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
यावेळी दिव्याला ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात विमानतळाबाहेर नेण्यात आले. विमानतळापासून तिच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. जॉर्जिया येथील बातुमी येथे आयोजित फिडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 वर अवघ्या 19 व्या वर्षी नागपूरच्या दिव्या देशमुखने आपली मोहर उमटवून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र शासनातर्पे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत 2 ऑगस्ट रोजी जाहीर नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. नागपूर कन्येच्या या जागतिक यशाबद्दल आयोजित समारंभासाठी नागपूरकरांसह जिह्यातील सर्व क्रीडा संघटना, 2 ऑगस्ट रोजी सुरेश भट सभागफहात सकाळी 11.30 वाजता आवर्जून सहभागी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठकीत व्यक्त केला.