दिव्या देशमुख, कोनेरू हंपी उपांत्य फेरीत
चिनी खेळाडूंविरुद्ध उपांत्य लढती, हरिकाचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ बातुमी, जॉर्जिया
हळूहळू भारताची महत्त्वाची खेळाडू होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने आपल्याच देशाच्या तिच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या द्रोणावली हरिकाला पराभवाचा धक्का देत फिडे महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. तिच्याप्रमाणे कोनेरू हंपीनेही उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.
क्लासिकलमधील दोन डाव अनिर्णीत राहिल्यानंतर रॅडिप टायब्रेकमध्ये हरिकावर दडपण आले आणि दिव्याने निर्धारी खेळ करीत त्याचा लाभ घेतला आणि पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसरा डाव जिंकून बरोबरी साधण्याच्या दबावाखाली हरिकाने चमत्काराची अपेक्षा केली होती. पण तसे होऊ शकली नाही. हा डावही गमवावा लागल्याने हरिकाचे आव्हान समाप्त झाले. याच फॉरमॅटप्रमाणे खेळलेल्या यापूर्वीच्या स्पर्धेत हरिकाने तीन वेळा उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी या स्पर्धेला वर्ल्ड महिला चॅम्पियनशिप म्हटले जात होते. हम्पी व दिव्या या आणखी दोन भारतीयांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. ही स्पर्धा म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलचा एक भाग आहे.
दिव्याच्या या यशामुळे महिलांच्या कँडिडेट्स स्पर्धेत भारताच्या किमान एका खेळाडूचा प्रवेश निश्चित झाला आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे. या स्पर्धेतील विजेती ही विद्यमान महिला वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या जु वेनजुनची आव्हानवीर असेल. सुमारे दशकभर उच्च मानांकनावर असणाऱ्या कोनेरू हंपीने कारकिर्दीत पहिल्यांदाच येथील स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून ही स्पर्धा तिला अद्याप एकदाही जिंकता आलेली नाही. मुलांच्या विभागाप्रमाणे महिला विभागातही भारताची ताकद वाढत असल्याचेच दिसून येत आहे.
दिव्याने पहिल्या डावात इटालियन ओपनिंगचा अवलंब केला. डावाच्या मध्यावर प्रतिआक्रमणाचा शोध घेताना हरिकाचे अंदाज चुकले. त्याचा तिला फटका बसला आणि दोन पांढऱ्या मोहरांच्या बदल्यात तिने आपला वजीर गमविला. उर्वरित खेळात दिव्याने सहज विजय नोंदवला. परतीच्या डावात हरिकाला विजयाची गरज होती. पण दिव्याने भक्कम बचाव करीत तिला यश मिळू दिले नाही. जलद डावात हरिका मिळालेल्या संधींचा फायदा उठविण्यासाठी ओळखली जाते. पण दिव्याविरुद्ध तिला तशा संधी मिळाल्या नाहीत आणि शानदार पद्धतीने दिव्याने हरिकाचे आव्हान संपुष्टात आणत आगेकूच केली. उपांत्य फेरीत हंपीची लढत अग्रमानांकित चीनच्या लेइ टिंगजीविरुद्ध तर दिव्याची लढत माजी वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या टॅन झाँगयीविरुद्ध होईल.