दिव्या देशमुखला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गोव्यामध्ये 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान पहिल्यांदाच होणाऱ्या 2025 च्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेत शेवटच्या क्षणी एका स्पर्धकाने माघार घेतल्याने दिव्याला संधी मिळाली आहे.
नागपूरच्या 19 वर्षीय दिव्याने अलिकडेच फिडे ग्रँड स्वीस बुद्धिबळ स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. गोव्यात होणाऱ्या या आगामी स्पर्धेत आता भारताचे 20 अव्वल बुद्धिबळपटू आपला सहभाग दर्शवित असून त्यामध्ये विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशचा समावेश आहे. सदर स्पर्धा प्रत्येक दोन वर्षांनी भरविली जाते. ही स्पर्धा बाद फेरी पद्धतीनुसार खेळविली जाणार असून जगातील अव्वल 206 बुद्धिबळपटू या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवित आहेत. या स्पर्धेत ठरणारे पहिले तीन अव्वल बुद्धिबळपटू 2026 च्या कॅन्डीडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरतील. चीनची जु वेनजुन व हौ यिफान यांनी याआधीच या स्पर्धेतून माघार घेतली आहे.