घटस्फोटित महिला चालवितात बाजार
बहुतांश महिला मुस्लीमधर्मीय
घटस्फोट कुणासाठीच आनंदाची बाब नसते, परंतु पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे, जेथे महिला आनंदाने स्वत:च्या घटस्फोटाचा जल्लोष करतात. घटस्फोटानंतर पार्ट्यांचे आयोजन केले जोत. लोक नाचतात, गातात आणि मौजमजा करतात. याला ‘डिव्होर्स पार्टी’ म्हटले जाते. महिला ढोल वाजवून स्वत:च्या समाजाला आजपासून माझी मुलगी घटस्फोटित झाल्याचे सांगते. यानंतर या महिला स्वत:चे जीवन सावरतात, याकरता या घटस्फोटित महिलांकडून बाजारपेठ चालविली जाते. येथे या महिलांची दुकाने असून तेथे कपड्यांपासून प्रत्येक गरजेच्या गोष्टीची विक्री होते.
पश्चिम आफ्रिकन देश मॉरिटेनिया येथे या परंपरेचे पालन केले जाते. वाळवंटी देश असलेल्या मॉरिटेनियामध्ये अनेकदा घटस्फोट घेणे सामान्य बाब आहे. याचमुळे या महिलांसाठी ही दु:खात बुडून जाण्याची नव्हे तर आनंदाची बाब असते. घटस्फोटानंतर महिला स्वत:च्या मुलांसमवेत माहेरी परतते, तेथे तिची आई आणि बहिणी तिचे स्वागत करतात. जघ्रौटा नावाचा एक ध्वनी काढला जातो, घरातील महिला आणि पुरुष नाचतात आणि आनंद व्यक्त करतात.
मैत्रिणी देतात पार्टी
महिलेचे कुटुंबीय तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे वैगुण्य सांगतात, पतीने नेमके काय गमावले याची त्याला जाणीव नसल्याचे म्हणत त्याची चेष्टा केली जाते. महिलेच्या मैत्रिणी एक मोठी पार्टी आयोजित करतात. ही पार्टी संबंधित महिलेला टीकेच्या सर्व बंधनांपासून मुक्त करते. महिला यानंतर स्वतंत्र हेते आणि दुसरा विवाह करू शकते.
मॉरिटेनियामध्ये राहणाऱ्या बहुतांश महिला मुस्लीमधर्मीय आहेत. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा आईला मिळतो. अशा स्थितीत त्यांचे पालनपोषण आणि स्वत:चे जीवन जगण्यासाठी महिलेला काम करावे लागते. काही महिला नोकरी करतात. तर अनेक महिला येथील डिव्होर्स मार्केटमध्ये दुकान सुरू करतात, किंवा तेथील दुकानात काम करू लागतात. घटस्फोट हा आमच्यासाठी जल्लोषाचे कारण असतो. आम्ही एक नवे आयुष्य सुरू करतो असे या महिलांचे सांगणे आहे. या महिलांना पुन्हा विवाह करता येतो. तसेच स्वत:च्या मर्जीने नवा पती निवडता येतो.