विवाहाच्या तीन मिनिटांनीच घटस्फोट
पतीने केलेल्या टिप्पणीमुळे नववधू संतप्त
विवाहित दांपत्यांमध्ये भांडणं होतच असतात. अनेकदा ही भांडणं विकोपाला गेल्याने विवाह टिकत नाही. याचबरोबर अनेक लोक तर विवाहाच्या दशकांनंतरही या बंधनाला एका झटक्यात तोडून टाकतात. परंतु कुठल्याही दांपत्याच्या विवाहाच्या दिवशीच घटस्फोट झाल्याचे कळल्यावर धक्का बसेल. कुवैतमध्ये असा प्रकार घडला आहे, तेथे विवाहाच्या केवळ तीन मिनिटांनी वधू आणि वराने घटस्फोट घेतला आहे.
दोघांचाही अधिकृत विवाह झाल्यावर दांपत्य न्यायालयातून बाहेर पडण्यासाठी वळले, तेव्हाच नववधूचा पाय अडखडला आणि ती कोसळली. तेव्हा पतीने नववधूला मूर्ख असे संबोधिले. हे ऐकून महिलेला राग आला आणि तिने न्यायाधीशाला त्वरित विवाह रद्द करण्यास सांगितले. यावर न्यायाधीशही त्वरित सहमत झाले आणि त्यांनी विवाहाच्या तीन मिनिटांनीच घटस्फोट मंजूर केला. देशाच्या इतिहासातील हा सर्वात छोट्या कालावधीचा विवाह असल्याचे म्हटल sजात आहे.
ज्या विवाहात कुठलाच सन्मान नसतो, तो प्रारंभापासूनच अयशस्वी असतो आणि येथे हेच घडले असल्याचे एका युजरने म्हटले आहे. पती जर सुरुवातीलाच असा वागत असेल तर त्याला सोडून देणेच योग्य, भले मग तीन मिनिटांपूर्वी विवाह झाला असो किंवा तीन वर्षांपूर्वी असे अन्य एका युजरने प्रतिक्रियेदाखल नमूद केले आहे.
अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण नाही. तर 2004 साली ब्रिटनमध्ये एका जोडप्याने विवाहाच्या केवळ 90 मिनिटांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि त्यांचा हा घटस्फोट मंजूर देखील झाला होता.