25 लाखांचे अमलीपदार्थ नष्ट जिल्हा पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात जप्त केलेले 25 लाख रुपये किमतीचे 450 किलोहून अधिक अमलीपदार्थ गुरुवारी नष्ट केले. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हारुगोप्प, ता. सौंदत्ती येथील दि बेळगाव ग्रीन इन्व्हीरॉनमेंटल मॅनेजमेंट या कारखान्यात नियमानुसार अमलीपदार्थ नष्ट केले. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपालकृष्ण गौडर यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी 12 प्रकरणातील 25 लाख 27 हजार 450 रुपये किमतीचे 455 किलो 582 ग्रॅम अमलीपदार्थ कारखान्याच्या भट्टीत नष्ट केले. न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने जिल्हा ड्रग डिस्पोजल कमिटीने अमलीपदार्थ नष्ट केल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले.