जि. पं.- ता. पं. निवडणुका नोव्हेंबरनंतर?
निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पंचायत व तालुका पंचायत सभागृह बरखास्त होऊन जवळपास अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा जि. पं.- ता. पं. निवडणुकांकडे लागल्या आहेत. सदर निवडणुका नोव्हेंबरनंतर घेण्याची शक्यता निवडणूक विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये कर्नाटक पंचायत राज सीमा निर्णय आयोगाकडून पुनर्रचना करण्यात आलेले मतदारसंघ जाहीर केले आहेत. जिल्ह्यामध्ये 91 जिल्हा पंचायत मतदारसंघ व 304 तालुका पंचायत मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या धावपळीतून सरकारी यंत्रणा नुकतीच मोकळी झाली आहे. त्यामुळे या निवडणुका तातडीने घेण्याची शक्यता कमी आहे.
मतदारसंघांची पुनर्रचना 2023 च्या सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आली आहे. यावर हरकतीही मागविण्यात आल्या होत्या. त्या हरकतींचे निराकरण करण्यात आले असून मतदारांच्या संख्येवरून मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सीमा आयोगाकडून तालुका पंचायत व जिल्हा पंचायत मतदारसंघ पुनर्रचना करताना त्यामध्ये येणारी गावे व मतदारसंघाच्या संख्येवरून मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकांची मतमोजणी लवकरच होणार असून यानंतर राज्यातील जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. मात्र, या निवडणुका तातडीने घेण्याची शक्यता कमी आहे. मनुष्यबळ व निवडणूक विभागाची तयारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर निवडणुका डिसेंबरनंतर घेतल्या जाण्याची अधिक शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जारी करण्यात आल्यानंतर विकासकामे ठप्प झाली आहेत. यामुळे तात्काळ निवडणूक घेणे कठीण आहे. याचा परिणाम विकासकामांवर होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे ता. पं.-जि. पं. निवडणुका घेण्यासाठी सरकार वेळ लावू शकते, असे निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.