जि.पं.निवडणूक : उद्यापासून अर्ज प्रक्रिया
20 रोजी निवडणूक, 22 रोजी निकाल: आदर्श आचारसंहिता लागू : 8.68 लाख मतदार बजावणार हक्क : महिला मतदारांत लक्षणीय वाढ
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील जिल्हा पंचायतींसाठी येत्या दि. 20 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्याचे नक्की झाले असून त्यासोबतच उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत क्षेत्रात तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत एकूण 8.68 लाख मतदार आपला हक्क बजावणार असून मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मिनिन डिसोझा यांनी दिली. यापूर्वी दि. 13 डिसेंबर रोजी घेण्याचे निश्चित झालेली ही निवडणूक नंतर सात दिवसांसाठी पुढे ढकलताना दि. 20 रोजी घेण्यासंबंधी पंचायत संचालनालयाने अधिसूचना जारी केली होती. आता त्याच तारखेवर शिक्कामोर्तब झाल्याचे डिसोझा यांनी सांगितले.
त्यासंबंधी शनिवारी आल्तिनो येथे आयोगाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डिसोझा बोलत होते. त्यावेळी वेनान्सियो फुर्तादो आणि सागर गुरव हे अधिकारी उपस्थित होते. दि. 1 डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार असून दि. 20 रोजी निवडणूक आणि दि. 22 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होऊन या प्रक्रियेची सांगता होईल, असे डिसोझा यांनी सांगितले.
8.68 लाख मतदार बजावणार हक्क
राज्यात जिल्हा पंचायतीसाठी एकूण 8,68,637 नोंदणीकृत मतदार आहेत. पैकी उत्तर गोव्यात 2,13,529 पुऊष आणि 2,25,948 महिला व 3 तृतीयपंथी मिळून एकूण 4,39,480 मतदार आहेत, तर दक्षिण गोव्यात 2,06,902 पुऊष, 2,22,253 महिला व 2 तृतीयपंथी मिळून एकूण 4,29,157 मतदार आहेत.
राज्यात दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 25 अशा एकूण 50 जिल्हा पंचायती आहेत. त्यातील उत्तर गोव्यातून महिलांसाठी 9, अन्य मागासवर्गासाठी 7, तर अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी प्रत्येकी 1 मिळून 18 मतदारसंघ राखीव आहेत. तर दक्षिण गोव्यातून महिलांसाठी 10, अन्य मागासवर्गासाठी 6, आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी 5 मिळून 21 मतदारसंघ राखीव आहेत.
राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होत असल्या तरीही अपक्ष उमेदवारही ही निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरणार असून प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त 5 लाखपर्यंत खर्च करण्याची मुभा असेल. ही खर्च मर्यादा ओलांडली जाऊ नये यावर देखरेख ठेवण्यासाठी 15 जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे, असे डिसोझा यांनी स्पष्ट केले.
निवडणूक सविस्तर कार्यक्रम
दि. 1 ते 9 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मात्र दि. 3 रोजी जुने गोवेतील फेस्त आणि दि. 7 रोजी रविवार असल्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. दि. 10 रोजी अर्जांची छाननी होणार असून दि. 11 रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. दि. 22 रोजी मतमोजणीने प्रक्रियेची सांगता होईल, असे डिसोझा यांनी सांगितले.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी एकूण 1,284 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यातील उत्तर गोव्यात 658 आणि दक्षिण गोव्यात 626 केंद्रे असतील, असे ते म्हणाले.
आदर्श आचारसंहिता लागू
राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून अर्थात काल शनिवारपासून तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्हा पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागात ती लागू असेल. मात्र सर्व पालिका क्षेत्रे आणि पणजी मनपा क्षेत्रांना ती लागू होणार नाही, असे डिसोझा यांनी सांगितले.
पालिका क्षेत्रात आचारसंहिता नाही
दरम्यान, निवडणूक घोषणेसोबतच राज्यात कालपासून सर्व जिल्हा पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असले तरी पणजी महानगरपालिका आणि अन्य पालिका क्षेत्रात ही आचारसंहिता लागू होणार नाही, असे डिसोझा यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त पोलिस, फिरती पथके तैनात
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, तसेच आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीवर लक्ष ठेवता यावे या उद्देशाने पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बळ तैनात केले आहे. तर आयोगाने 15 जणांचे फिरते पथक आणि देखरेख पथक तैनात केले आहे.