कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हाधिकारी सोमवारी बायपासला देणार भेट

12:43 PM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हलगा-मच्छे बायपास प्रकरण : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार : शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे अनधिकृतरित्या काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. बायपासचे काम सुपिक जमिनीतून करण्यात येत असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. सदर कामाचा खटला न्यायप्रविष्ट आहे. तरीही बायपासचे काम बेकायदेशीरपणे सुरूच आहे. ते तात्काळ थांबवून न्यायालयाच्या निकालापर्यंत काम थांबवून तो रद्द व्हावा, अशी मागणी वडगाव शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हलगा-मच्छे बायपास करताना हा रस्ता सुपिक जमिनीतून करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा येत असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच या कामामुळे शेतकऱ्यांना समस्या येत आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही काम होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, असेही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

Advertisement

आदेशाला वाटाण्याच्या अक्षता 

बेळगावचा झिरो पाईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासचे काम करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. असे असतानासुद्धा महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार पोलीस प्रशासनाच्या मदतीने बळजबरीने त्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत बायपासचे काम सुरू आहे. त्यामुळे या पट्ट्यातील शेतकरी कंगाल होणार आहेत. तेव्हा वेळोवेळी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास सबळ पुराव्यासह प्रत्यक्ष बैठकीमध्ये निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्याचबरोबर बायपासच्या कामाची जी वर्कऑर्डर आहे, ती चुकीची आहे. कारण बेळगावचा झिरो कि.मी. पॉईंट हा अनेक वर्षांपासून फिशमार्केट कॅम्प बेळगाव येथे निश्चित केलेला आहे.

त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे सदर पॉईंट महामार्गाजवळील अलारवाडच्या ब्रिजजवळ दाखविला आहे. ठेकेदार जी वर्कऑर्डर दाखवत आहेत ती फिशमार्केट कॅम्प येथे असलेला झिरो पॉईंट महामार्ग क्र. 4 अ हा खानापूर ते गोवा रुंदीकरण करा म्हटलेले आहे. त्यामध्ये बायपासचा कोणताही संबंध येत नाही. तो रद्द करण्यासाठी गेल्या 2009 पासून आजपर्यंत शेतकरी प्रत्येक मार्गाचा अवलंब करत लढत आहेत. तेव्हा हा सदरी बायपास रद्द व्हावा म्हणून वेळोवेळी केंद्र सरकार, राज्य सरकार त्याचबरोबर न्यायालय, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. तरीही बायपासचे काम बेकायदेशीरपणे सुरूच आहे. ते तात्काळ थांबवून न्यायालयाच्या आदेशाच्या निकालापर्यंत काम थांबवून तो रद्द व्हावा, असे नमूद करण्यात आले आहे.

आपण सोमवारी स्वत: आढावा घेणार

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, येत्या सोमवारी आपण स्वत: येऊन कामाचा आढावा घेणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना समस्या येत आहेत. याची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर राहणार असून शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकऱ्यांनी उपस्थित राहून गाऱ्हाणे मांडावे

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे सोमवार दि. 24 रोजी मच्छे येथे बायपासच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असूनही आजपर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. कामासाठी बळजबरीने जमिनी घेतल्या असून शेतकऱ्यांना पाठबळाची गरज आहे. जिल्हाधिकारी स्वत: भेट देणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले गाऱ्हाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडावे, असे आवाहन बेळगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article