जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर
19 ऑक्टोबरला मतदान : शनिवारपासून अर्ज प्रक्रियेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (बीडीसीसी) बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक रविवार दि. 19 ऑक्टोबर रोजी होणार असून प्रांताधिकारी कार्यालयाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शनिवार, 4 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. बेळगाव, हुक्केरी, खानापूर, चिकेडी, रायबाग, अथणी, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, गोकाक, कित्तूर, कागवाड, मुडलगी, निपाणी व यरगट्टी या एकूण 15 तालुक्यातून प्रत्येकी एक व जिल्ह्यातील तालुका शेती उत्पादक विक्री सहकारी संघ, ग्राहक सहकारी संघ, अर्बन सहकारी बँक, कृषीयेत्तर पत सहकारी संघ, दूध उत्पादक संघ, कामगार सहकारी संघ, विणकर सहकारी संघ, औद्योगिक सहकारी संघ आदी संघांकडून 1 अशा 16 जागांसाठी ही निवडणूक होणार असून निवडून आलेल्या संचालकांचा कार्यकालावधी 5 वर्षांचा असेल. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतील. पात्र मतदारांची यादी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता बीडीसीसी बँकेच्या (जुना पीबी रोड, बेळगाव) सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणे दि. 4 ते 11 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत,उमेदवारांच्या अर्जांची छाननी 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 पासून, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे 12 ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 पर्यंत, निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी जाहीर करणे व आवश्यकता असल्यास निवडणूक चिन्हांचे वाटप करणे 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 नंतर, निवडणूक चिन्हासह उमेदवारांची यादी जाहीर करणे 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 नंतर, 19 ऑक्टोबर रोजी बी. के. मॉडेल हायस्कूल (कॅम्प) येथे सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होईल. मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूकसंबंधीची संपूर्ण माहिती बँकेच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाज वेळेत उपलब्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधितांनी अर्जासोबत ठेवीची पावती (डिपॉझिट रिसिट) जोडणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी उमेदवार किंवा त्यांच्या सूचकांनी हजर राहावयाचे आहे. उमेदवारांना राजकीय पक्ष व ऱाष्ट्रीय चिन्हाव्यतिरिक्त अन्य चिन्हांची निवड करण्यास मुभा आहे.