सरकारी शाळांमध्ये न पिकलेल्या केळ्यांचे वितरण
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका : शिक्षण विभागाचे साफ दुर्लक्ष : चांगल्या दर्जाची केळी देण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव शहरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून कच्च्या केळ्यांचे वितरण केले जात आहे. यामुळे विद्यार्थी केळी खाण्याऐवजी ती कचराकुंडीत टाकत आहेत. तसेच या कच्च्या केळ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची पिकलेली केळी वितरित करण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गातून करण्यात येत आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर व्हावे यासाठी अंडी तसेच केळी वितरण मागील काही वर्षांपासून केले जात आहे. मध्यंतरी केळीऐवजी शेंगदाणा चिक्कीचेही वितरण केले जात होते. परंतु चिक्कीबाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर त्याचे वितरण थांबविण्यात आले. कर्नाटकात अजिज प्रेमजी फौंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम सर्व सरकारी शाळांमध्ये राबविला जात आहे.
केळी वितरण करणाऱ्या संस्थेकडे बोट दाखवत केले हात वर
मागील काही दिवसात कच्च्या केळ्यांचे वितरण सुरू असल्याचे दृष्टीस पडत आहे. पिकलेल्या केळ्यांचे दर वाढले असल्यामुळे कच्चीच केळी विद्यार्थ्यांना वितरित केली जात आहेत. विद्यार्थी खाण्याऐवजी ती बेंचमध्ये अथवा कचराकुंडीत टाकत आहेत. याबद्दल काही पालकांनी शिक्षकांना जाब विचारला असता त्यांनी केळी वितरण करणाऱ्या संस्थेकडे बोट दाखवत हात वर केले.
पाहणी करून संबंधितांना ताकीद द्या
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून चांगले उपक्रम सुरू आहेत. परंतु वितरकांकडून चांगल्या दर्जाची व न पिकलेली केळी वितरित केली जात असल्याचे दृष्टीस पडत आहे. शिक्षण विभागाने याची पाहणी करून संबंधितांना ताकीद देणे गरजेचे आहे.
- किसन सुंठकर (पालक)