कर्नाटक राज्य स-अभिवृद्धी संघटनेच्या प्रतिभा पुरस्कारांचे वितरण
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे मार्गदर्शन
बेळगाव : दलितांच्या विकासासाठी समाजात एकी, शिक्षण, उद्यमशिलता, राजकारण व समाजकारणात प्रतिनिधित्व यावर लक्ष दिले पाहिजे. समाजातील लोकांचे कल्याण झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आमचे भविष्य अवलंबून आहे, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कर्नाटक राज्य स-अभिवृद्धी संघटनेच्यावतीने कन्नड भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार व राज्योत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येकाला इतिहासाची जाण असेल तरच नवा समाज निर्माण करणे शक्य होणार आहे. वर्षानुवर्षे दलितांचे अपमान झाले आहेत. आपल्या पूर्वजांनी भोगलेला अन्याय पुढच्या पिढीवर भोगण्याची वेळ येऊ नये, यासाठी शिक्षणावर भर द्यावा. संविधान नसते तर विहिरीतील पाणी पिण्यास काही समुदायांनी दिले नसते, असे त्यांनी सांगितले.
गरिबीमुळे अनेक जण शिक्षणापासून वंचित होत आहेत. सुशिक्षित समाज निर्मितीसाठी सरकारने सातत्याने प्रयत्न करूनही पूर्ण प्रमाणात ते शक्य झाले नाही. आर्थिकरीत्या पुढारलेल्यांनी गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देण्याचे प्रयत्न केले तर समाजात बदल घडू शकतो. समाजासाठी बेळगावात जागेची गरज आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. चित्रपट अभिनेते किंवा क्रीडापटूंपेक्षा समाजसुधारकांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवावेत. बुद्ध, बसव, आंबेडकरांची शिकवण आत्मसात करून समाज विकासासाठी काम करण्याचे आवाहन सतीश जारकीहोळी यांनी केले. यावेळी आमदार राजू सेठ, साहित्यिक य. रु. पाटील, पोलीस अधिकारी ज्योतिर्लिंग व्हनकट्टी, संघटनेचे अध्यक्ष सुभाष नेत्रेकर, भीमराव पवार, शिवकुमार दोडमनी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.