For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पशुसंगोपन खात्यातर्फे बियाणांचे वाटप

09:37 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पशुसंगोपन खात्यातर्फे बियाणांचे वाटप
Advertisement

बेळगाव : जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत मोफत दर्जेदार बियाणांचे वाटप केले जात आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यातून शेतकऱ्यांना जोंधळा आणि मका वितरीत केला जात आहे. संबंधित शेतकऱ्यांनी सात-बारा उतारा देवून बियाणे घेवून जावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात चाराटंचाईचे संकट गडद होवू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी बियाणांचे वाटप केले जात आहे. पाच किलो जोंधळा बॅग आणि 6 किलो आफ्रीकन टॉल मका दिला जात आहे. हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी ही बियाणे दिली जात आहे. वर्षभर चांगल्या प्रतिचे वैरण उपलब्ध व्हावे, यासाठी पशुसंगोपनचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील हिरेबागेवाडी, उचगाव, सांबरा, कडोली, येळ्ळूर, काकती, निलजी, नंदिहळ्ळ, वडगाव, आंबेवाडी, संतिबस्तवाड, अनगोळ आदी ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून या बियाणांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी आणि जनावरांना मुबलक चारा उपलब्ध व्हावा, यासाठी ही दर्जेदार बियाणे दिली जात आहेत. गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्याबरोबर सुका आणि ओला चारा मिळेनासा झाला आहे. यासाठी गोकाक, चिकोडी आणि अथणी तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. चारा संकट टळावे यासाठी पशुपालकांना चांगल्या प्रतिची बियाणे दिली जात आहेत. या बियाणांमुळे जनावरांसाठी हिरवा आणि सुका चारा उपलब्ध होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.