1 एप्रिलपासून नव्या रेशनकार्डांचे वितरण
मंत्री के. एच. मुनियप्पा यांची माहिती
बेंगळूर : नवीन बीपीएल आणि एपीएल कार्डांचे 1 एप्रिलपासून वितरण केले जाईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांनी विधानसभेत दिली. गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तर चर्चेवेळी काँग्रेसच्या आमदार नयना मोटम्मा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुनियप्पा यांनी नवीन एपीएल आणि बीपीएल कार्ड वितरण 1 एप्रिलपासून सुरू होईल. नवीन अर्ज दाखल झाल्यानंतर महिनाभरात कार्ड वाटपाचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यापूर्वी नवीन बीपीएल कार्डांसाठी 2.95 लाख अर्ज आले असून या अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. या सर्व प्रलंबित अर्जांची पडताळणी 31 मार्चपर्यंत पूर्ण करून पात्र कुटुंबांना रेशनकार्ड वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. प्रलंबित अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नव्या कार्डांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
नियमांमध्ये शिथिलता
बीपीएल रेशनकार्डधारकांकडे चारचाकी वाहन नसावे, हा नियम शिथिल करण्यात आला असून ज्यांच्याकडे स्वत:चे चारचाकी वाहन आहे त्यांनाही बीपीएल कार्ड दिले जाणार आहे. तसेच बीपीएल कार्डधारकांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. ग्रामीण भागात 3 हेक्टर कोरडवाहू किंवा बागायती जमीन असलेली कुटुंबे वगळता शहरी भागात 1 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या जागेवर घर असणाऱ्या कुटुंबांना बीपीएल कार्ड न देण्याचा नियम आहे.