जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 8414 क्विंटल बियाणांचे वितरण
यंदा कृषी खात्याकडून उत्पादन वाढीचे उद्दिष्ट : शेतकऱ्यांकडून पेरणीची कामे सुरू
बेळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या तयारीत शेतकरी गुंतले आहेत. शेत जमिनीची मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करण्यात येत आहे. कृषी खात्याकडून रब्बी हंगामात सबसीडीवर बियाणे पुरविली जातात. काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू आहेत. यंदा कृषी खात्याकडून रब्बी हंगामासाठी मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार 31,400 क्विंटल बियाणे वितरण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यापैकी 8414 क्विंटल बियाणांचे वितरण करण्यात आले आहे.
यंदा मान्सूनला लवकर सुरुवात झाली. जिल्ह्यात मे महिन्यापासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले होते. यामुळे शेतकरीही चांगला पाऊस होईल या भावनेने पिके घेतली होती. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले. परिणामी हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. मात्र दुबार पेरणीवरही पावसाचे संकट ओढावल्याने समस्येत भर पडली.
अद्याप खरीप हंगामातील पिकांची कापणी होणे बाकी आहे. काही ठिकाणी पिकांची कापणी करण्यात आली असून काही भागात शिल्लक आहे. कापणी केलेल्या भागात रब्बी हंगामाची तयारी शेतकरी जोमात करत आहेत. ते शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असून पेरणी करण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. यंदा जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा अधिक पिकांचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट कृषी खात्याने ठेवले आहे. यादृष्टीने बियाणांचे वितरणही करण्यात येत असून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना बियाणे पुरविली जात आहेत.
कृषी खात्याकडून बियाणाचा मुबलक साठा
यंदा जिल्ह्यात कृषी खात्याने 31 हजार 400 क्विंटल बियाणांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार 8 हजार 414 क्विंटल बियाणे वितरित करण्यात आली आहेत. तर 17 हजार 678 क्विंटल बियाणांचे वितरण शिल्लक आहे. सर्वाधिक 7 हजार 644 क्विंटल हरभरा बियाणे वितरित करण्यात आली आहेत. तर सर्वात कमी 15 क्विंटल सूर्यफूल बियाणे वितरित केली आहेत. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील विविध भागात रब्बीची पेरणी चालू होणार असून कृषी खात्याकडून बियाणाचा मुबलक साठा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात 31400 क्विंटल बियाणाची मागणी
यंदा जिल्ह्यात 31400 क्विंटल बियाणाची मागणी आहे. यामध्ये ज्वारी 1500, मका 1300, गहू 2000, हरभरा 25000, भूईमूग 1000, सूर्यफूल 600 क्विंटल बियाणांची मागणी आहे. आतापर्यंत मका 560, ज्वारी 30, गहू 165, हरभरा 7644, सूर्यफूल 15 क्विंटल बियाणांची विक्री करण्यात आली आहे. ज्वारी 940, मका 860, गहू 1725, हरभरा 13,776, सूर्यफूल 377 क्विंटल बियाणांचा अद्याप जिल्ह्यात साठा असून आवश्यकता भासल्यास आणखी साठा करण्यासाठी कृषी खाते प्रयत्नशील राहणार आहेत.