नवीन नियमांतर्गत 28 वीजमीटरचे वितरण
ओसी-सीसीची सक्ती हटविली, मात्र बिल्डींग परमिशन गरजेचे : सर्वसामान्यांना सात महिन्यांनंतर दिलासा
बेळगाव : नवीन बांधकामांना ओसी आणि सीसी प्रमाणपत्रातून दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे मागील दहा दिवसात हेस्कॉमच्या शहर विभागातून 28 वीजमीटर देण्यात आले आहेत. ओसी, सीसी प्रमाणपत्राच्या सक्तीमुळे मागील सात महिन्यांत केवळ 10 ते 20 मीटर देण्यात आले होते. परंतु, आता सक्ती हटविल्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी मीटरसाठी अर्ज दाखल केले आहेत. अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यादरम्यान ओसी, सीसी प्रमाणपत्र सक्तीचे असल्याचे म्हटले होते. याचाच आधार घेऊन कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने मार्च 2025 पासून बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडे ओसी, सीसी प्रमाणपत्र असेल तरच वीजमीटर देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. या दोन्ही प्रमाणपत्रांसाठी अनेक किचकट नियमावली ठेवण्यात आल्या होत्या.
एनए लेआऊट भूखंडासह इमारतीच्या चारही बाजूंनी योग्य प्रमाणात जागा सोडलेली असेल तरच त्यांना प्रमाणपत्र दिले जात होते. बेळगाव शहरात अरुंद भूखंड असल्यामुळे त्यांना आजूबाजूला जागा सोडणे अशक्य असल्यामुळे हे प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यामुळे 6 ते 7 महिन्यात केवळ हातावर मोजण्याइतकेच वीजमीटर वितरित झाले होते. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने ओसी, सीसी प्रमाणपत्राची अट शिथिल केली आहे. बाराशे चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या घरबांधणी करणाऱ्या ग्राहकांना यापुढे वीजमीटर दिला जाणार आहे. परंतु, त्यासाठी बिल्डींग परमिशनची सक्ती करण्यात आली आहे. मागील दहा दिवसात बेळगाव शहर उपविभाग-1, 2 व 3 अंतर्गत 28 ग्राहकांना वीजमीटर देण्यात आले आहे. शहरातील सीटीएस, बुडा तसेच एनए लेआऊट व एनए असलेल्या भूखंडांना वीजमीटर दिला जात आहे. परंतु, बाँड खरेदी तसेच सबरजिस्टर खरेदी असलेल्या भूखंडांना मात्र वीजमीटर दिले जात नसल्याचे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे.
बिल्डींग परमिशन सक्तीचेच
ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (ओसी) व कम्प्लिशन सर्टिफिकेट (सीसी) यांची सक्ती शिथिल करण्यात आली असली तरी बिल्डींग परमिशन तसेच अॅप्रुव्हड् प्लान मात्र वीजमीटरसाठी गरजेचेच आहे. बाराशे स्क्वेअर फूट अथवा त्याहून कमी बांधकाम असलेल्या ग्राऊंड 2 फ्लोअर, बेसमेंट 3 फ्लोअर केवळ या घरांनाच ओसी व सीसीची आवश्यकता नाही. अन्य बांधकामांना मात्र ही दोन्ही प्रमाणपत्रे सक्तीचीच आहेत.
बाँड खरेदीवर दिलासा नाहीच
बाँड खरेदीद्वारे भूखंड घेतलेल्यांची संख्या बेळगाव शहरात सर्वाधिक आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी वीजमीटरच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, हेस्कॉमने बिल्डींग परमिशन तसेच अॅप्रुव्हड् प्लान सक्तीचे केल्यामुळे त्यांना वीजमीटर मिळू शकत नाही. त्यामुळे बाँड खरेदीद्वारे भूखंड घेतलेल्यांना हेस्कॉमच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.