For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिक्रमणावरून कंग्राळी खुर्दमध्ये वाद

11:21 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
अतिक्रमणावरून कंग्राळी खुर्दमध्ये वाद
Advertisement

रामदेव गल्लीतील रस्त्याबाबत कायदेशीर बाबी तपासून मंगळवारपर्यंत कार्यवाही करण्याचे पीडीओंचे आश्वासन

Advertisement

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील रामदेव गल्लीतील रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावरून सोमवार दि. 1 रोजी अतिक्रमणकर्ते आणि गल्लीतील रहिवाशांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्राम पंचायत आणि पीडीओंनी कायदेशीर बाबी तपासून मंगळवारपर्यंत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गल्लीतील संतप्त जमाव शांत झाला. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या रामदेव गल्लीतील रस्त्याचे आणि गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या शेवटच्या टोकावर बांधण्यात आलेल्या घर मालकाने रस्त्यावर अतिक्रमण करून संरक्षण भिंत बांधली आहे. त्यामुळे रस्ता निमूळता बनला असून सदर रस्ता 18 फुटाचा होणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविण्यात यावीत, अशी मागणी गल्लीतील रहिवाशांनी केल्याने यापूर्वी दोन-चारवेळा मोजणीदेखील करण्यात आली आहे. मात्र त्याला घरमालक जुमानत नसल्याने शेवटी 16 फुटाचा रस्ता करण्याचे ठरवून कामाला सुरुवात करण्यात आली.

रस्ता करण्यास विरोध केल्याने रहिवाशांचा आक्षेप

Advertisement

सोमवारी सदर घरासमोर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असता घर मालकाने रस्ता करण्यास विरोध केला. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी त्याला जोरदार आक्षेप घेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवून 16 ऐवजी 18 फुटाचा रस्ता करावा, ग्राम पंचायतीने जेसीबीद्वारे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आल्याने शाब्दिक चकमक उडाली. परिणामी काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्ता निमूळता असल्याने चारचाकी वाहने वळणेही कठीण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी र्रुग्णवाहिकेला वळण घेता न आल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्यांनी अनेकवेळा सांगूनदेखील घर मालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे घटनास्थळी पीडीओंना पाचारण करण्यात आले. भूमिअभिलेख कार्यालयातून कागदपत्रे मागविण्यात येतील, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

अतिक्रमण हटविण्यात येत नाही तोपर्यंत रस्ताकाम बंद ठेवण्याची मागणी

जोपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी संतप्त जमावाने केली. वादग्रस्त ठिकाणच्या रस्त्याचे काम बंद ठेवून उर्वरित रस्त्याचे काम सुरू करण्यास हरकत घेऊ नये, अशी मागणी ठेकेदारांनी केली. त्यामुळे मंगळवारपर्यंत कारवाईची वाट पाहू, त्यानंतर जोपर्यंत अतिक्रमण हटविले जात नाही. तोपर्यंत रस्ता व गटारीचे काम करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली. रस्त्यावरील अतिक्रमणावरून रामदेव गल्लीत वाद सुरू असल्याची माहिती समजताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत ग्राम पंचायत आता कोणती भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Advertisement
Tags :

.