कॅनडा विरोधी पक्षनेत्यावर नाराजी
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडात साजऱ्या केल्या जात असलेल्या दीपावली समारंभातून कॅनडातील विरोधी पक्षनेत्यांनी स्वत:ला अलग केले आहे. त्यामुळे त्या देशातील भारतीय वंशाचे नागरीक नाराज झाले असून त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर टीका केली आहे. भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याने आम्ही दीपावलीच्या उत्सवापासून स्वत:ला अलग ठेवले आहे, असे स्पष्टीकरण कॅनडातील विरोधी पक्षनेते पेरी पोईलिव्हर यांनी मंगळवारी दिले होते. दीपावलीच्या उत्सवात त्यांनी राजकारण आणावयास नको होते, असे भारतीय वंशाच्या नागरीकांचे म्हणणे आहे.
कॅनडात दरवर्षी तेथील भारतीय वंशाचे नागरीक दीपावली उत्सव उत्साहात साजरा करतात. या उत्सवात तेथील राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी होतात. यंदा मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यातील राजकीय तणावामुळे दीपावली उत्सवात सत्ताधारी लिबरल पक्षाचे नेते सहभागी झाले नव्हते. मात्र, तेथील विरोधी पक्षनेत्यांनी या उत्सवात सहभागी होण्याची तयारी केली होती. तथापि, ऐनवेळी यांनी उत्सवापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय वंशाचे नागरीक नाराज झाले होते. आम्ही कॅनडाच्या प्रगतीत मोठे योगदान केले असूनही आजही आम्हाला या देशात परकेपणाची वागणूक दिली जाते. आम्हाला कॅनडाचे नागरीकत्व मिळाले असले तरी आम्ही ‘बाहेरचे’ म्हणून संबोधलो जातो, अशी भावना अनेक भारतीय वंशाचे नागरीक बोलून दाखवित आहेत. या भारतीय वंशाच्या नागरीकांची ‘ओव्हरसीज फ्रेंडस् ऑफ इंडिया कॅनडा या नावाची संस्था आहे. या संस्थेने कॅनडातील विरोधी पक्षनेत्यांवर या संदर्भात टीका केली आहे.
विश्वासघात केल्याची भावना
कॅनडातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अचानकपणे उत्सवातून अंग काढून घेतल्याने येथील भारतीय नागरीकांच्या मनात आपला विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. आम्ही आमच्या भावना या राजकीय पक्षांना एका संयुक्त पत्राद्वारे कळविल्या आहेत. राजकारण त्याच्या स्थानी आहे. मात्र, सण आणि उत्सव साजरे करताना राजकारण मधे येऊ देता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे या संस्थेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.