प्रलंबित कामांबाबत नगरसेवकांकडून नाराजी
महापालिका विकास आढावा बैठक
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या विकास आढावा बैठकीत पाणीपुरवठा, ड्रेनेज, सार्वजनिक बांधकाम, पथदीप तसेच इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली. वर्ष उलटले तरी अद्याप अनेक विकासकामे प्रलंबित असल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. ड्रेनेजच्या समस्येवर बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली. शहराचा विस्तार वाढत असल्याने त्यामानाने ड्रेनेज लाईन वाढवाव्या लागतील, अशा सूचना करण्यात आल्या. शुक्रवारी महापालिकेची विकास आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याची तक्रार करण्यात आली. आरपीडी कॉर्नर येथे ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने धोका वाढल्याचे सांगण्यात आले. तर आरपीडी येथील धोकादायक अर्धवट स्थितीतील बसस्टॉप कोसळण्याची सूचनाही करण्यात आली. समर्थनगर येथे रस्त्याची दुरवस्था, आनंदनगर-वडगाव येथील ड्रेनेजवाहिनी, वडगाव स्मशान रोड याबरोबरच इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
नगरसेवकांनी मागील आर्थिक वर्षात झालेल्या कामांची माहिती महापौर सविता कांबळे यांच्याकडे मागितली. यावेळी मनपा अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले की 71 विकासकामांपैकी 35 कामे पूर्ण झाली असून उर्वरित 36 कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. दिवाळीपूर्वी महापालिकेच्या सर्व कामगारांचे वेतन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. चिदंबरनगर येथील स्मशानभूमीतील शेगडी खराब झाल्याने ती दुरुस्त करावी, अशी मागणी मागील वर्षभरापासून करण्यात येत आहे. परंतु, अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी करण्यात येत असल्याची तक्रार नगरसेविका वाणी जोशी यांनी केली. यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, अनगोळसह शहरातील सर्वच स्मशानभूमीत दुरुस्तीसाठी 21 लाख 61 हजार रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच सर्व स्मशानभूमीतील कामे पूर्ण केली जातील, असे सांगण्यात आले.
बैठकीला अधिकारीच अनुपस्थित
महापालिकेची विकास आढावा बैठक असतानाही महसूल व अन्य विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने महापौर सविता कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीची पूर्वकल्पना देऊनदेखील अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने काही अधिकाऱ्यांना समज देण्यात आली. तसेच अधिकारीच नसतील तर बैठकीचा उपयोगच काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
नगरसेवकांकडून अधिकारी धारेवर,कोणत्याही सुविधांविना अपार्टमेंटना मंजुरी कशी?
बेळगाव शहरात शेकडो फ्लॅट्स असलेल्या अपार्टमेंटना गटारी, ड्रेनेज सुविधा विचारात न घेता मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील ड्रेनेजची अवस्था भयाण होणार असून महापालिकेच्या गलथान कारभारावर बोट ठेवत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शुक्रवारी झालेल्या विकास आढावा बैठकीत गटारी व ड्रेनेजचा विषय महत्त्वाचा ठरला. शहरात काही वर्षांपूर्वी ड्रेनेजवाहिन्या घालण्यात आल्या होत्या. सध्या वाढते शहरीकरण पाहता या ड्रेनेजवाहिन्या अपुऱ्या पडत असतानाच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही विचार न करता अपार्टमेंटना परवानगी दिली जात आहे. वीरभद्रनगर-शिवाजीनगर येथे एका 145 फ्लॅट असलेल्या इमारतीला मंजुरी देताना महापालिका कर्मचाऱ्यांनी पुढील कोणताही विचार केला नाही का? असा प्रश्न नगरसेविका रेश्मा भैरक्कन्नावर यांनी उपस्थित करताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. केवळ परवानगीच नाही दिली तर अपार्टमेंटच्या तळमजल्यातील पाणीही थेट ड्रेनेजला जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. असे असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून डोळेझाक का केली जाते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. संबंधित मालकाला समस्येची माहिती देण्यात आली असून स्वतंत्र ड्रेनेजवाहिनी घालण्याची त्यांनी कबुली दिल्याचे सांगितले. परंतु, परवानगी दिलीच कशी? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.
नानावाडी-आश्रय कॉलनी परिसरातही अपार्टमेंटची उभारणी ...
नानावाडी-आश्रय कॉलनी परिसरातही भूमिगत ड्रेनेज व्यवस्था नसतानाही अपार्टमेंटची उभारणी सुरू आहे. भविष्यात या अपार्टमेंटला ड्रेनेजवाहिनी जोडावी लागणार असल्याने अपार्टमेंटला परवानगी देण्यापूर्वीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गटारी, ड्रेनेज, पाणीपुरवठा याचा विचार करावा व त्यानंतरच परवानगी द्यावी, अशी सूचना नगरसेवक नंदू मिरजकर यांनी केली.