सिंधुदुर्गातील बालसंगोपन संस्थांना दुय्यम स्थान ?
अनाथ बालसंगोपन योजनेत बाहेरील संस्थांची निवड, स्थानिकांमध्ये नाराजी
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनाथ, निराधार, आणि निराश्रित मुलांच्या संगोपनासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेत स्थानिक संस्थांना स्थान न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. लातूर, उस्मानाबाद, सांगली, आणि धाराशिव जिल्ह्यातील सहा बाहेरील संस्थांची निवड झाल्यामुळे, सिंधुदुर्गातील स्थानिक संस्थांना योजनेत संधी का मिळाली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
30 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना लागू केली. योजनेचा उद्देश 0 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, आणि दुर्धर आजारी पालकांच्या मुलांना संस्थेत दाखल न करता पर्यायी कुटुंबांमध्ये संगोपन करणे आहे. यामुळे मुलांना संस्थात्मक वातावरणाऐवजी घरगुती वातावरणात त्यांचा विकास होऊ शकेल.या योजनेअंतर्गत पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या सहा संस्थांची निवड झाली, मात्र या सर्वच संस्था बाहेरील जिल्ह्यातील आहेत. लातूर, उस्मानाबाद, सांगली, आणि धाराशिव येथील संस्थांना संधी देण्यात आली असून, त्या संस्था जिल्ह्याबाहेर असल्या तरी त्यांची सिंधुदुर्गात शाखा असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “सिंधुदुर्गातील संस्थांनीही उत्कृष्ट काम केले आहे, मग त्यांना का डावलले गेले?” असा सवाल उपस्थित होत आहे. योजनेच्या उद्देशानुसार मुलांना स्थानिक परिसरात संगोपन मिळणे गरजेचे असताना, बाहेरील संस्थांना प्राधान्य दिले जाणे जिल्ह्यातील मुलांसाठी कितपत योग्य आहे, यावर चर्चा रंगली आहे.
बाहेरील संस्थांना संधी, स्थानिकांना अपयश
मुलांच्या संगोपनाची जबाबदारी या सहा संस्थांना देण्यात आली आहे. प्रत्येक संस्थेला 200 मुलांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. यामुळे लातूर, उस्मानाबाद, सांगली, आणि धाराशिव जिल्ह्यातील संस्थांना आर्थिक सहाय्य आणि इतर सुविधा दिल्या जातील. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक संस्थांना अपयश का आले, याचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना स्थानिक पातळीवर संगोपन मिळणे अत्यावश्यक आहे. बाहेरील संस्थांनी जिल्ह्यात शाखा उघडल्या असल्या तरी स्थानिक मुलांना त्यांच्या नैसर्गिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणातच योग्य वाढ होऊ शकते. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी सरकारकडे स्थानिक पातळीवर संस्थांची निवड करण्याची मागणी केली आहे.स्थानिक संस्थांनी योजनेत सहभाग घेण्यासाठी योग्य तयारी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे जिल्ह्यातील निराधार मुलांना त्यांच्या घराच्या जवळपासच योग्य संगोपन मिळू शकेल आणि त्यांचे मानसिक, शारीरिक, आणि सामाजिक विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अनाथ, निराश्रित मुलांच्या संगोपनासाठी बाहेरील संस्थांना प्राधान्य दिले जात आहे. स्थानिक पातळीवर ही कामगिरी करत असलेल्या संस्थांना संधी न मिळाल्यामुळे आम्हाला मोठी निराशा झाली आहे,” असे एका सामाजिक कार्यकर्त्याने म्हटले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना चांगल्या उद्देशाने सुरू करण्यात आली असली तरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थांना त्यात संधी न मिळाल्याने स्थानिक पातळीवर नाराजीचा सूर उमटला आहे. योजनेचे उद्दिष्ट आणि त्याची अंमलबजावणी योग्य रितीने होणे आवश्यक असून, जिल्ह्यातील मुलांना स्थानिक वातावरणातच संगोपन मिळणे हे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे.