For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोखरण येथे शस्त्रसामर्थ्याचे प्रदर्शन

06:33 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोखरण येथे शस्त्रसामर्थ्याचे प्रदर्शन
Advertisement

पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था / पोखरण

राजस्थानातील पोखरण येथे भारताच्या संरक्षण विभागाने देशाच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन केले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तसेच 40 देशांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक भारतनिर्मित शस्त्रास्त्रांनीही प्रसंशा प्राप्त केली आहे. शस्त्रसंभार निर्मितीत भारताची आत्मनिर्भरता जगाच्या पटलासमोर मांडण्यासाठीच या कार्यक्रमाचे प्रामुख्याने आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे. अनेक स्वदेशनिर्मित शस्त्रास्त्रांच्या दर्शनामुळे उपस्थित भारावून गेले होते.

Advertisement

या शस्त्रप्रदर्शनात टी-20 रणगाडे, धनुष आणि सारंग या अत्याधुनिक गनससिस्टिम्स, आकाश शस्त्रसिस्टिम्स, रसद पुरविणारे ड्रोन्स, यंत्रमानवीय साधने, आधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स, तसेच अनेक प्रकारची मानवरहीत वायुवाहने, यांचा समावेश होता. भारतीय बनावटीच्या युद्ध विमानांनीही आपल्या शक्तीची चुणूक दाखविली. भारतीय भूदलाकडून या प्रदर्शनात भूमीवर आणि आकाशमंडलात प्रभावीपणे उपयोगात आणल्या जाऊ शकणाऱ्या अनेक शस्त्रास्त्रांचा परिचय करुन दिला आहे. अनेक प्रकारांमधील क्षेपणास्त्रेही समाविष्ट करण्यात आली होती.

युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे

या प्रदर्शनात भारतीय नौदलाने शत्रूच्या युद्धनौकांना नष्ट करण्यासाठीच्या भारतनिर्मिती क्षेपणास्त्रांचेही प्रदर्शन केले. तसेच स्वयंचलित साधनसामग्री वहन करणारी वायुवाहने, एक्स्पेंडेबल एरियल लक्ष्यवधी शस्त्रे आदींची चुणूक दाखविली. भारतीय वायुदलाने भारतनिर्मित तेजस विमानांचे प्रदर्शन केले. हलकी मालवाहू हेलिकॉप्टर्स, आधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स आदींचा समावेश होता.

सज्जतेचा संदेश

भारत केव्हाही आपल्या सीमांचे संरक्षण करण्यास सिद्ध आहे, असा संदेश भारताच्या शेजारी राष्ट्रांना या प्रदर्शनातून देण्यात आला आहे. कोणत्याही शत्रूने भारतावर हल्ला करण्याचे दु:साहस दाखविलेच, तर त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी भारत सज्ज आहे, हे या प्रदर्शनातून देशवासियांनाही समजले आहे. नुकतेच भारताने अग्नी-5 या विविध लक्ष्यांवर एकाचवेळी क्षेपणास्त्रे डागू शकणाऱ्या वायुवाहनाचे यशस्वी परीक्षण करुन चीनलाही योग्य संदेश दिला आहे.

पोखरणचे महत्व

पोखरण येथेच भारताने आपल्या आजपर्यंतची दोन अणुपरीक्षणे केली आहेत. या परीक्षणांनंतरच भारताचा समावेश जगातील अण्वस्त्रधारी देशांमध्ये अधिकृतरित्या करण्यात आला होता. यामुळे पोखरण या स्थानाचे महत्व केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठीही आहे. त्यामुळेच या स्थानी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ते यशस्वी झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी 1 हजारांहून अधिक निमंत्रित उपस्थित होते. या निमंत्रितांनाही नंतर भारताच्या शस्त्रसामर्थ्यासंबंधी अभिमान व्यक्त केला आहे.

तेजस विमान कोसळले

शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पोखरण येथे होत असताना या स्थानापासून 100 किलोमीटर अंतरावर एक तेजस विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानाचा चालक मात्र सुखरुप बचावला आहे. विमानाला अपघात झाल्यानंतर त्वरित त्याचे स्वयंचलित आसन विमानातून बाहेर पडल्याने तो वायूछत्रीच्या साहाय्याने सुखरुप खाली उतरला, या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अपघात घडण्याच्या तांत्रिक कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.

शस्त्रप्रदर्शनामुळे आत्मविश्वासात वाढ

ड भारतनिर्मिती अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाने जनतेला योग्य संदेश

ड भारताच्या सामर्थ्याची जगाला जाणीव करुन देण्याचा उद्देश झाला साध्य

ड देशात यापुढे स्वदेशनिर्मित शस्त्रास्त्रांवरच भर देण्याचा सरकारचा निर्धार

ड डीआरडीओ यापुढे पाचव्या पिढीतील विमानांची निर्मिती करण्यास सज्ज

Advertisement
Tags :

.